इरळी ड्रग्ज तस्करी प्रकरण : नवी मुंबईतून 3.46 कोटी जप्त | पुढारी

इरळी ड्रग्ज तस्करी प्रकरण : नवी मुंबईतून 3.46 कोटी जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील इरळी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीमधील ड्रग्जनिर्मिती आणि तस्करी अड्ड्यावर झालेल्या छापेमारीनंतर मुंबई क्राईम ब—ँच कक्ष 7 पथकाने तस्करी टोळीचा जेरबंद म्होरक्या प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (वय 35) याच्या नवी मुंबई येथील साथीदाराच्या घरावर शनिवारी पहाटे छापा टाकला. साथीदाराला ताब्यात घेतले असून, यावेळी 3 कोटी 46 लाखांची रोकड हस्तगत केली.

प्रवीण शिंदेसह वासुदेव जाधव यांच्या काही साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. ड्रग्जनिर्मिती आणि तस्करीमधील आर्थिक उलाढालीशी सहभाग असावा का, याचीही वरिष्ठस्तरावर माहिती घेण्यात येत आहे. संबंधितांना चौकशीला मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असेही समजते.

मुंबई क्राईम ब—ँच विशेष पथकाने सोमवारी (दि. 25) इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील वासुदेव जाधव याच्या द्राक्षबागेतील पत्र्याच्या शेडवजा घरावर छापा टाकून 245 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त करून म्होरक्यासह 6 जणांना अटक केली आहे. चौकशीत दीड वर्षापासून ड्रग्जनिर्मितीचा अड्डा सुरू असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या प्रवीण शिंदे, प्रसाद मोहिते, विकास मलमे, वासुदेव जाधव, अविनाश माळी, लक्ष्मण शिंदे यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. प्रवीण शिंदे याच्या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाताला लागत आहेत. तस्करीतील उलाढालीतून आलेली मोठी रोकड त्याच्या नवी मुंबई येथील एका मित्राकडे लपविल्याची माहिती उघड झाली आहे.

विशेष पथकाने पहाटे नवी मुंबईत छापा टाकून 3 कोटी 46 लाख रुपये हस्तगत केले आहेत. शिवाय, मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ड्रग्ज तस्करी उलाढालीत सहभाग आढळल्यास संबंधितावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपायुक्त दत्ता नलवडे, वरिष्ठ निरीक्षक नीरज उबाळे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, इरळी येथील छापेमारीप्रकरणी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने 9 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Back to top button