Lok Sabha Election 2024 | हातकणंगले मतदारसंघात आवाडेंची उडी, ‘महाविकास आघाडी’च्या संपर्कात | पुढारी

Lok Sabha Election 2024 | हातकणंगले मतदारसंघात आवाडेंची उडी, 'महाविकास आघाडी'च्या संपर्कात

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता डॉ. राहुल आवाडे यांनीही उडी घेतली आहे. महायुतीने विश्वासात घेतले नसल्याचे म्हणत त्यांनी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केला आहे. आवाडे गटाकडून आज (दि.२९) प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. येत्या दोन दिवसांत डॉ. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीबाबत नेमकी भूमिका जाहीर होणार आहे. त्यानंतरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मैदानातील चुरस ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 : दोन दिवसांत भूमिका होणार जाहीर

राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. राहुल यांच्यासह आ. प्रकाश आवाडे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली येथे ठाण मांडून होते. महायुतीकडून विद्यमान खा. धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यातच डॉ. राहुल आवाडे यांनीही रिंगणात उतरणार असल्याची भूमिका जाहीर केल्याने महायुतीपुढील पेच वाढण्याची चिन्हे आहेत. राहुल आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने या अनुषंगाने कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, आवाडे समर्थक व लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बंद खोलीत यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. बैठकीनंतर उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. मात्र लोकसभा निवडणुकीबाबत आवाडे गटाकडून येत्या दोन दिवसांत नेमकी भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

संजय पवार यांनी घेतली आवाडे यांची भेट

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. माजी खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडे पाठिब्यासाठी आग्रह धरला आहे. त्यातच डॉ. राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे ठरवल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी त्यांची कोल्हापुरात भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास बंद खोलीत त्यांची चर्चा झाल्याचे समजते. आवाडे यांच्याशी महाविकास आघाडीने संपर्क सुरू केल्याने त्याचीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा 

Back to top button