कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर सलग दुसर्या दिवशीही तापलेले होते. मंगळवारी पारा आणखी वाढला. दिवसभरात शहरात 38.2 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातही वाढ झाली असून, दिवसभरात 25 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर पारा वाढतच चालला आहे. मंगळवारीही सरासरी कमाल तापमानात 1.6 अंशांनी, तर किमान तापमानात तब्बल 4 अंशांनी वाढ झाली. यामुळे आजही उष्म्याने कोल्हापूरकरांच्या अंगातून घामाच्या धारा काढल्या. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक होती. वाढत्या उन्हाने दुपारी घराबाहेर पडण्याचेही अनेक जण टाळत आहेत. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत बाजारपेठा, व्यापारीपेठांतील वर्दळ मंदावली आहे. अनेक जण छत्र्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचेही चित्र आहे. उन्हाच्या तडाख्याने आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
जिल्ह्यात यावर्षीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी पारा 39 अंशांवर जाईल, असाही अंदाज आहे. यानंतर मात्र तापमानात पुन्हा घट होईल, अशीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
चाळिशी पार केलेली देशातील शहरे : पाली (राजस्थान) : 41, जैसलमेर (राजस्थान) : 41.8, बारमेर (राजस्थान) : 40.8, बिकानेर (राजस्थान) : 40.8, बोपानी (हरियाणा) : 42.1, तिरुपती (आंध्र प्रदेश) : 41.1, आनंद (गुजरात) : 40.5, भूज (गुजरात) : 43, अहमदाबाद (गुजरात) : 41.