काेल्‍हापूर जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार : हजारहून अधिक गर्भपाताचा संशय | पुढारी

काेल्‍हापूर जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार : हजारहून अधिक गर्भपाताचा संशय

रविराज वि.पाटील

गारगोटी : संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील टोळीने पैशाच्या हव्यासापोटी तब्बल हजारहून अधिक गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुख्य आरोपी विजय कोळस्कर याच्या घराच्या पाठीमागील जनावरांच्या गोठ्यामध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती. यासाठी महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबायला सांगून डोळ्याला पट्टी किंवा स्कार्फ बांधून मोटारसायकलवरून या ठिकाणी नेले जात होते. चाचणी झाल्यानंतर पुन्हा आहे, त्या ठिकाणी आणून सोडले जात होते. सोनोग्राफी मशिनजवळ पती किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस नेले जात नव्हते. त्यामुळे या महिलांना आपणास कुठे नेले याचा थांगपत्ताही लागत नव्हता. इतकी कमालीची गुप्तता पाळली जात होती.

कोळस्कर हा गर्भलिंग निदान चाचणीसाठी दहा हजार रुपये घेत होता. गर्भपातासाठी किमान 25 हजार पासून 50 हजार दर होता. समोरील गिर्‍हाईक पाहून दर ठरत होता. मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात होते. काही शासकीय कर्मचार्‍यांना तर भली मोठी किंमत मोजावी लागत होती. गोळ्या देऊन गर्भपात करण्याची जबाबदारी बाबूराव पाटील याची होती तर सिव्हिल सर्जन समजली जाणारी शीला माने ही गर्भाची विल्हेवाट लावत होती. या टोळीने जिल्ह्यासह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गिर्‍हाईकांकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळले आहेत. या प्रकरणातील दिगंबर किल्लेदार, शीला माने व सर्जेराव अशोक पाटील हे वाय. पी. गँग या ठिकाणी कामाला होते. त्यांच्याकडूनच त्यानी ही सर्व कला हस्तगत केली होती.

विजय लक्ष्मण कोळस्कर व सर्जेराव पाटील याच्यावर राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता तर दिगंबर किल्लेदार व शीला माने यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात पुन्हा नोंद होता तरी देखील या बहाद्दरांनी पैशाच्या लालसेपोटी गर्भलिंग निदान निदान चाचणी करण्याचा हव्यास सोडला नाही. (उत्तरार्ध)

गर्भपातासाठी वापरले जाणारे किट हे दोन गोळ्यांचे आहे. या गोळ्या बाजारात तीनशे रुपयांपासून हजार रुपयापर्यंत मिळतात. मात्र लोकांच्या असाहयतेचा फायदा घेऊन या टोळीने तब्बल 25 ते 50 हजार रुपये उकळण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे मुख्य आरोपीसह एजंट मालामाल होऊन गेले

त्यांनी गाडी, बंगले आणि जमिनी यामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समजते. यातील मुख्य आरोपी विजय कोळस्कर याची संपत्ती ही डोळे दीपवणारी अशीच आहे. या प्रकरणातून कोळस्कर यांने बक्कळ पैसा आणि संपत्ती कमावली आहे. गाडी, आलीशान बंगला, चैनी विलासी जीवन शैली याचा विचार करता किती मोठ्या प्रमाणात गर्भपात झाले असतील याचा अंदाजच लावणे कठीण काम झाले आहे.

Back to top button