धक्कादायक ! : आईच्या गर्भातच उमलणार्‍या कळ्या खुडण्याचे महापाप; गोठ्यात गर्भलिंग चाचणीचा गोरखधंदा, पोलिसांकडून पर्दाफाश | पुढारी

धक्कादायक ! : आईच्या गर्भातच उमलणार्‍या कळ्या खुडण्याचे महापाप; गोठ्यात गर्भलिंग चाचणीचा गोरखधंदा, पोलिसांकडून पर्दाफाश

रविराज वि. पाटील

गारगोटी : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे गर्भलिंग निदान चाचणी बिनबोभाटपणे सुरू असल्याची माहिती आरोग्य पथक व पोलिसांना मिळली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. विजय कोळस्कर याच्या घराच्या पाठीमागील गोठ्यात हा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

आईच्या गर्भातच उमलणार्‍या कळ्या खुडण्याचे महापाप करणार्‍या व संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या या टोळीचा भुदरगड पोलिस आणि आरोग्य पथकाने पर्दाफाश केला आहे.

कोणतेही वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना बेकायदेशीर व्यवसाय तसेच गर्भलिंग निदान चाचणी करणार्‍या विजय कोळस्कर यास रंगेहाथ पकडून वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाने 15 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, स्विफ्ट कार, गर्भपात करण्यासाठी वापरले जाणारे किट ताब्यात घेतले. त्यानंतर खर्‍या अर्थाने तपासाला गती आली.

विजय कोळस्करसह बाबूराव दत्तू पाटील (रा. बामणी, ता. कागल) या मुख्य एजंटसह तब्बल 15 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सागर शिवाजी बचाटे (सोनाळी, ता. कागल), सचिन सातापा कोरके (बानगे), नंदकुमार मारुती कांबळे (नानीबाई चिखली), दिगंबर मारुती किल्लेदार, शीला शामराव माने (तिटवे, ता. राधानगरी), सर्जेराव अशोक पाटील (सिरसे), अमोल सुरेंद्र सुर्वे (रुई, ता. हातकणंगले), युवराज आनंदा कांबळे (कुंभोज पैकी माळवाडी दुर्गेवाडी), स्वप्निल केरबा पाटील (बालिंगा, ता. करवीर), बाळासाहेब पुंडलिक पाटील (खाटांगळे), कुंतीनाथ आप्पासो चौगुले (अकिवाट, ता. शिरोळ) यांच्यावर कारवाई झाली आहे. वाकरे (ता. करवीर) येथील डॉ. श्रेयांश शेटे अद्याप फरारी आहे. या 15 जणांमध्ये आयुर्वेदिक डिग्री घेतलेल्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे.
(पूर्वार्ध)

16 एजंट पुरवायचे गिर्‍हाईक

मडिलगे खुर्द येथील विजय लक्ष्मण कोळस्कर हा सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करत असे, तर बामणी येथील बाबूराव दत्तू पाटील याच्याकडे गोळ्या देऊन गर्भपात करण्याची जबाबदारी होती. गर्भपाताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी शीला माने हिच्याकडे होती. याशिवाय तब्बल 16 एजंटांवर गिर्‍हाईक पुरविण्याची जबाबदारी होती.

Back to top button