जलस्रोतांची सुरक्षा रामभरोसे…

जलस्रोतांची सुरक्षा रामभरोसे…
Published on
Updated on

कोल्हापूर : गायी-म्हशी यांच्यासह इतर पाळीव जनावरे, दुचाकी-चारचाकी व तत्सम वाहने, घरातील अंथरुण, प्रापंचिक साहित्य यांची स्वच्छता थेट नदी, तलावाच्या पात्रात केली जात आहे. घरात नको झालेल्या वस्तू, कचरा, खराब झालेले खाद्यपदार्थ, फाटके कपडे, एक्स्पायर झालेली औषधे टाकण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे नदी, तलाव बनले आहेत.

शेतीतील खते व उद्योगातून बाहेर पडणारी रसायने थेट नदी, तलावाच्या पाण्यात मिसळतात. अशा अनेक कारणांनी जलस्रोत प्रचंड प्रदूषित होत आहेत. हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने जीवनदायिनी जलस्रोतांची सुरक्षा रामभरोसे आहे.

जल दिनाचा उद्देश

प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असणार्‍या अनमोल पाण्याचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 1992 मध्ये याबाबतचा ठराव मंजूर करून 22 मार्च हा जागतिक पाणी दिवस म्हणून घोषित केला. त्यानुसार सन 1993 पासून जागतिक जल दिन साजरा केला जातो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे हा यामागचा उद्देश आहे.

मानवी चुकांमुळे पाणस्थळे प्रदूषित

सन 2050 पर्यंत 7 अब्जाहून अधिक लोक पाण्याची कमतरता असलेल्या भागात असतील. 2040 पर्यंत जगभरातील पाण्याची मागणी 50 टक्के वाढेल. यावर उपाय म्हणून जलसंधारण काळाची गरज आहे. असे असतानाही उपलब्ध पाणस्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विविध मानवी चुकांमुळे पाणस्थळे प्रदूषित होत आहेत.

जल कायदा अंमलबजावणी अत्यावश्यक

भारतातील जल प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारा केंद्रीय कायदा म्हणजे जल कायदा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) सन 1974 झाला. जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी हा कायदा लागू करण्यात आला; मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने जलस्रोत दिवसेंदिवस अधिकच प्रदूषित होत चालले आहेत. यामुळे सजीवांना पाण्याची आखणी कमतरता भासणार आहे.

राजर्षी शाहूंच्या कृतिशील कार्याचा विसर

कोल्हापूरची जीवनदायिनी असणार्‍या पंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 100 वर्षांपूर्वी कृतिशील उपाययोजना राबविली होती. 1 एप्रिल 1906 रोजी याबाबतचा आदेश जाहीर केला होता. त्यावेळी पंचगंगा नदीतील पाणी विविध कारणांनी प्रदूषित होते. त्यावर उपाय म्हणून इंजिन व मोटारीच्या साहाय्याने नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर काहिलीत घेऊन त्याचा वापर करावा, असे आदेश दिले होते. राजर्षींच्या या दूरद़ृष्टीचा विसर कोल्हापूरकरांना पडल्याचे वास्तव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news