महामार्गावर ड्रग्जचा खुला बाजार! | पुढारी

महामार्गावर ड्रग्जचा खुला बाजार!

दिलीप भिसे

कोल्हापूर : कर्नाटक, गोव्यासह राजस्थानातील नामचिन ड्रग्ज तस्कर टोळ्यांनी महामार्ग तसेच सीमाभागात स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून बनावट दारूसह ड्रग्ज तस्करीचा बाजार मांडला आहे. या टोळ्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी व सांगलीला टार्गेट केले आहे. महामार्गावरील मंगरायाचीवाडीतून होणारा ड्रग्जचा खुलेआम बाजार अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील कोगनोळी टोलनाका, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी उड्डाणपुलासह तावडे हॉटेल व मंगरायाचीवाडी, किणी टोलनाका परिसरातील तस्करीसह गैरकृत्यांची दबक्या आवाजात चर्चा असते. दारू, गुटख्यासह अमली पदार्थ तस्करीतील टोळी टप्प्याटप्प्यांवर कार्यरत असतानाही पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच महसूल यंत्रणांना त्याची खबरबात नसावी, याचेच आश्चर्य वाटते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगरायाचीवाडी फाट्यावर छापा टाकून 41 किलो अफू, गांजा जप्त करून राजस्थानातील म्होरक्यासह तिघांच्या मुसक्या आवळल्या.

महामार्गावरील दक्षता पथके गायब

कारनाम्यांना रोखण्यासाठी सीमाभागासह पुणे-बंगळूर आणि रत्नागिरी-नागपूर या प्रमुख दोन महामार्गांवर विविध ठिकाणी पथके स्वतंत्रपणे कार्यरत असल्याचा वरिष्ठ स्तरावर डांगोरा पिटला जातो. प्रशासनांतर्गत एवढा मोठा फौजफाटा कार्यरत असताना तस्करी होतेच कशी, हा सवाल आहे.

दावा किती खरा आणि किती खोटा!

निवडणुकांच्या तोंडावर यंत्रणा जाग्या होतात; मात्र अन्य काळात दक्षता पथकांच्या बेफिकिरीपणामुळे तस्करीला बळ मिळते, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. तस्करी होत असताना रात्रंदिवस महामार्गावर पहारा देणार्‍या पथकांनी दोन वर्षांत किती तस्करांच्या मुसक्या आवळल्या, हा कळीचा मुद्दा आहे.

चिरीमिरी अन् हप्तेबाजी

महामार्गावर दोन वर्षांत तस्करी टोळ्यांची दहशत आहे. अमली पदार्थांसह गुटखा, बनावट देशी, विदेशी दारूची रेलचेल आहे. अनेक ठिकाणी तपासणी पथके रात्रंदिवस कार्यरत असतानाही कोट्यवधीच्या उलाढाली सुरू आहेत. चिरीमिरी आणि हप्तेखोरीमुळेे तस्करीचे साम्राज्य फोफावले आहे.

कर्नाटकातील टोळ्यांची घरपोच डिलिव्हरी !

कर्नाटकातील सराईत टोळ्यांनी स्थानिक गुन्हेगारांसह यंत्रणांना हाताशी धरून म्होरक्यांना घरपोच गांजा पुरवठ्याचा उद्योग चालवला आहे. गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी उड्डाणपूल, तावडे हॉटेल, सांगली फाट्यासह शेंडा पार्क परिसरात बेधडक उलाढाली सुरू आहेत.

Back to top button