कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : टेंबलाई नाका उड्डाणपूल परिसरात सोमवारी सायंकाळी सशस्त्र जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयित साजन कुचकोरवी, बालाजी कुचकोरवी यांच्यासह 45 संशयितांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुसर्या दिवशीही परिसरात तणावपूर्ण शांतता होती. सायंकाळपर्यंत 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ताराराणी चौक परिसर येथील साजन कुचकोरवी, बालाजी कुचकोरवी, देवा जोंधळे, विशाल जगदाळे, आशिष पोवार, संजय कुचकोरवी, रोहित जोंधळे, संग्राम पोवार, अजय माने, रोहित माने, विवेक कुचकोरवी, विठ्ठल जाधव, करण कुचकोरवी, योगिराज चौगुले, सुमीत माकडवाले, सिद्धार्थ कुचकोरवी, आलोक कुचकोरवी, रचित माकडवाले (कॉनेश), दीपक माने, तिलोक कुचकोरवीसह अन्य अनोळखी अशा 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार तनपुरे यांनी ही माहिती दिली.
पूर्ववैमनस्य व कॉलेज कॅम्पस परिसरातील वर्चस्ववादातून दोन गटांत काही दिवसांपासून धुसफुस सुरूच होती. त्यात एकमेकांविरुद्ध कुरघोड्यांचा प्रकार सुरू होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची परिणीती सोमवारी सायंकाळी हाणामारीत झाली.
ताराराणी चौकातील 50 ते 60 जणांच्या जमावाने हातात तलवारी, कोयता, एडका, लोखंडी गज, काठ्या घेऊन टेंबलाई नाका उड्डाणपुलासह परिसरातील घरांवर हल्ला केला. 4 मोटारींसह 10 वाहनांची तोडफोड केली. यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली. व्यावसायिकांवरही हल्ले करून साहित्याची तोडफोड करण्यात आली. संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले.
सशस्त्र तरुणांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अनर्थ टळला. बादल प्रदीप जाधव (वय 24, रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी, कोल्हापूर) याच्या फिर्यादीनुसार मुख्य संशयितांसह 45 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह वाहनांची तोडफोड व हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.