शाहूवाडीत लोकसभेसाठी ३३३ मतदान केंद्रे; ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक | पुढारी

शाहूवाडीत लोकसभेसाठी ३३३ मतदान केंद्रे; ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक

सरूड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी विधानसभा (२७७) क्षेत्रातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील १८७ तर पन्हाळा तालुक्यातील १४६ अशा एकूण ३३३ मतदान केंद्रांवर २ लाख ९२ हजार ६५१ पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी वर्ग ३ दर्जाच्या ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने सहा स्थिर पथके आणि सहा भरारी पथकांचा सक्त पहारा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वयोवृद्ध व दिव्यांगांना घरातून मतदान करण्याची संधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १ लाख ५१ हजार ४०७ पुरुष मतदार (५१.७४ टक्के) आणि १ लाख ४१ हजार २४४ महिला मतदार (४८.२६ टक्के) मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये ३ हजार ६८९ तरुण नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वयाची ८५ वर्षे ओलांडलेले ४ हजार २८० वृद्ध मतदार तसेच ३ हजार १३५ दिव्यांग मतदारांना पहिल्यांदाच घरातून मतदान करता येणार आहे.

भरारी पथकांचा वॉच

शाहूवाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांच्या दुरुस्तीचा आढावा घेण्यात आला असून आवश्यक ठिकाणी योग्य त्या दुरुस्ती करण्याबाबतच्या संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्याचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सहा व्हिडीओ सर्व्हेक्षण पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येकी एक पथकप्रमुख, सदस्य तसेच व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. आंबा (ता. शाहूवाडी) व वाघबीळ (ता. पन्हाळा) येथे प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा स्थिर निरीक्षण पथके आणि सहा भरारी पथके २४ तास तैनात ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक विहित कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच वाहतूक आराखडा तयार करणे, केंद्रावरील आवश्यक सुविधांची उपलब्धता पाहणे, निवडणुकीत बाधा उत्पन्न करणारे, अशांतता/दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करणे, मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व केंद्रांवर पुरेसा कर्मचारी वृंद, सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्य आदी उपलब्धता असल्याची खात्री करणे, मतदान कर्मचारी यांच्या मतदान विषयक सर्व शंकांचे निरसन करणे, अभिरुप मतदानादिवशी अडचणी दूर करणे, मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्र बंद पडल्यास त्याजागी त्वरित नवीन मतदान यंत्र बदलून देणे, मतदान केंद्रावर मतदार मदत कक्ष कार्यरत ठेवणे आदी कामकाज स्वरूपात दक्ष राहण्याचे तसेच कामकाजात निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत, असेही शेवटी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button