कोल्हापूर : मनपाच्या शाळा 58; मुख्याध्यापक संख्या केवळ 21

कोल्हापूर : मनपाच्या शाळा 58; मुख्याध्यापक संख्या केवळ 21

कोल्हापूर : महानगरपालिका अधिनस्त शाळांची संख्या 58 असून मु्ख्याध्यापकांची संख्या केवळ 21 आहे. प्रशासनाचे मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत दुर्लक्ष आहे. सहायक शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
समाजातील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे 'आरटीई' कायद्यानुसार बंधनकारक आहे. सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालक अद्यापही मुलांना महापालिका, जिल्हा परिषद शाळेत घालतात. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांना स्पर्धा करता यावी, यासाठी शाळांत गुणवत्ता शिक्षण देणे महापालिकेची जबाबदारी आहे.

शहरात महापालिकेच्या अखत्यारित सुमारे 58 शाळा असून त्यामध्ये 10 हजार 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरातील बोटावर मोजण्याइतक्या शाळा वगळल्यास अन्य शाळांमधील पटसंख्या कमी होत चालल्याचे दिसून येते. महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या 21 मुख्याध्यापक कार्यरत आहेत, उर्वरित शाळांमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. महापालिका शाळांमध्ये मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक अशी मिळून सुमारे 414 जण कार्यरत आहेत. त्यामधील 335 कार्यरत आहेत. त्यामुळे गरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार हा प्रश्न आहे.

पवित्र पोर्टलमधून 20 शिक्षक

महापालिका शाळांमध्ये 267 सहायक शिक्षक मंजूर असून त्यामधील 234 कार्यरत आहेत. पदवीधर शिक्षकांची संख्या 126 असून त्यामधील 103 शिक्षक सध्या ज्ञानार्जनाचे काम करीत आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेतून महापालिका शाळांसाठी पवित्र पोर्टलमधून 20 शिक्षक मिळाले आहेत. त्यापैकी 17 जणांची कागदपत्र तपासणी झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news