चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या आऊटसोर्सिंगवर भर | पुढारी

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या आऊटसोर्सिंगवर भर

कोल्हापूर ः सतीश सरीकर,
कोल्हापूर महापालिकेचा बहुचर्चित आकृतिबंध अखेर राज्य शासनाने अटी घालून मंजूर केला; परंतु त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची अनेक पदे कमी केली आहेत. यात 381 कामगार, 127 शिपाई, 100 वाहन चालक आणि 112 मुकादम यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. ही पदे आऊटसोर्सिंगद्वारे भरण्यासाठी मुभा दिली आहे.एकीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांची पदे वाढवून दुसरीकडे चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकूण 938 पदे रद्द केल्याने महापालिका कर्मचारी संघाने आकृतिबंधाला विरोध केला आहे. परिणामी, हा आकृतिबंध वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. (Kolhapur)

Kolhapur : वेतनश्रेणी वाढविल्याने आर्थिक बोजा

नव्या आकृतिबंधात अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वेतन श्रेणीत बदल करून त्यात वाढ केली आहे. यात आरोग्यधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका सचिव, फायरमन यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सहायक आयुक्त यांची वेतन श्रेणी मात्र कमी केली आहे. दरम्यान, नगरसचिव यांच्याऐवजी महापालिका सचिव, तर आरोग्य निरीक्षकऐवजी स्वच्छता निरीक्षक, इस्टेट ऑफिसरचे मालमत्ता अधिकारी व इतर पदांच्या नावांतही आकृतिबंधात बदल केला आहे.

विविध सेवांवर होणार परिणाम

महापालिकेकडे अधिकार्‍यांची संख्या वाढणार आहे. साहजिकच त्यांच्यासाठी वाहनांची सोय महापालिकेला करावी लागणार आहे. त्या वाहनांत अधिकारी असतील; पण चालक मात्र आऊटसोर्सिंग करून खासगी ठेकेदारांकडून भरून घ्यावे लागणार आहेत. वर्कशॉपमध्ये 153 कर्मचारी होते. त्यापैकी 100 पदे कमी केली असून फक्त 53 कर्मचार्‍यांवर वर्कशॉप चालवावे लागणार आहे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे वाढविली असली तरी स्टाफ नर्स, आया, स्वीपर यांची पदे कमी केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे. उद्यान विभागात वरिष्ठ अधिकारी पदे वाढविली; मात्र स्वच्छता करणे, माळी काम करणारे नसल्याने बागांची स्वच्छता राखणार कशी, असा प्रश्न आहे. अशीच स्थिती महापालिकेच्या विविध विभागांत होणार आहे.

ही पदे रद्द (कंसात संख्या)

उपसंचालक, नगररचना (1), जकात मुख्याधिकारी (1), सहायक अधीक्षक, टंकलेखक (1), आरोग्य निरीक्षक (12), मार्केट इन्स्पेक्टर (1), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (1), अन्न निरीक्षक (1), विभागीय आरोग्य निरीक्षक (3), कीटकनाशक अधिकारी (1), लघुलेखक (1), इंजिन ड्रायव्हर कम फिटर (1), रायटर (4), फिटर ड्रेनेज (3), सुतार (11), वाहन चालक (100), अ‍ॅथलेटिक्स कोच कम क्लार्क (1), हस्त पावती कारकून (1), कनिष्ठ टंकलेखक (4), जिम्नॅशियम कोच कम क्लार्क (2), जलयंत्र दुरुस्तीकार (10), पाणीपट्टी वसुलीकार (10) वरिष्ठ टंकलेखक (2), आरेखक (2), हेड मेकॅनिक (1), हेड लोहार (1), दूरध्वनी चालक (2), छायाचित्रकार तथा कारागीर (1), रेफ्रिजरेटर अँड एअर कंडीशनर मेकॅनिक (1), मुकादम तथा लिपिक, मुकादम (112), असिस्टंट जिम्नॅशियम कोच (4), ड्रेसर (10), सहायक पेंटर (1), सहाय्यक सुतार (7), पहारेकरी, चौकीदार (47), आया कम स्विपर (54), हेल्पर कम प्युन (2), हेल्पर कम वॉचमन (2), हेल्पर कम स्विपर (1), शिपाई (127), कामगार (381), खलाशी (1), स्वच्छक (2), सफाईदार (1), नाभिक कम वॉर्डबॉय (1), सहायक विजतंत्री (3).

आकृतिबंध तयार करताना महापालिका कर्मचारी संघाबरोबर प्रशासनाने चर्चा केली नाही. अधिकार्‍यांची संख्या वाढविली; मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची संख्या कमी केली. त्यामुळे काम करणार कोण, असा प्रश्न आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे वाढवून 526 रोजंदार कर्मचार्‍यांना त्यात सामावून घ्यावे, ही मुख्य मागणी आहे. आकृतिबंध कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा असल्याने त्याला संघटनेचा विरोध आहे. लवकरच न्यायालयात दाद मागणार आहे.
– दिनकर आवळे, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी संघ

Back to top button