कोल्हापूर : सामंजस्य करारातून विद्यापीठाच्या प्रगतीत भर | पुढारी

कोल्हापूर : सामंजस्य करारातून विद्यापीठाच्या प्रगतीत भर

प्रवीण मस्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या दहा वर्षांत राज्य, देशासह आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, विविध शैक्षणिक संस्थांशी शैक्षणिक कार्यासाठी 200 हून अधिक सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विद्यापीठाच्या व्यवसाय, संशोधन, शैक्षणिक प्रगतीत भर पडली आहे. या करारांचा फायदा विद्यापीठाचा शैक्षणिक स्थर उंचावण्यासाठी झाला आहे.

विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, शैक्षणिक संस्था तसेच उद्योग, कंपन्यांसमवेत 2010 पासून आजपर्यंत सुमारे 175 हून अधिक सामंजस्य करार केले आहेत. याची मुदत दोन ते पाच वर्षे असते. गेल्यावर्षी देशांतर्गत 21, तर आंतरराष्ट्रीय 5 करार करण्यात आले. तीन वर्षांत 50 करार झाले आहेत. कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाने संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्यासाठी प्रगत संगणक विकास केंद्र पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. करारामध्ये जिओ इन्फॉर्मेटिक्स, डेटा मायनिंग, वायरलेस सेन्सर नेटवर्क, डिझायनिंग, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, बहुभाषिक तंत्रज्ञान यावर भर दिला आहे. करारामुळे विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ, मुंबई यांच्यासोबत सामंजस्य करार झाला आहे. करारामध्ये आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य विषयाचे ज्ञान मंडळ स्थापन केले आहे. करारामुळे मराठी विषयातील ज्ञान वाढविण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्याशी संशोधनविषयक करार केला आहे. यामध्ये संयुक्त प्रकल्प, प्रयोगशाळांची निर्मिती, प्रयोगशाळा सहकार्यावर भर दिला आहे. संशोधनाचे तंत्रज्ञानात रूपांतर व औद्योगिक सहकार्य वृद्धी या द़ृष्टीने करार महत्त्वाचा आहे. विद्यापीठाने उद्योग क्षेत्रात काही नावीन्यपूर्ण करार केले असून, यामध्ये सांगली येथील समृद्धी फाऊंडेशनचा समावेश होतो. या करारामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

शिवाजी विद्यापीठ व द कमोईश इन्स्टिट्यूट पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये करार झाला आहे. यामध्ये पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती प्रसार, शिक्षक प्रशिक्षण, वैज्ञानिक व सांस्कृतिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य केले जाणार आहे. करारामुळे भाषेचा प्रसार व व्याप्ती यासाठी भर दिला जाणार आहे. नवीन औषधनिर्मितीच्या संशोधनातील बदलामुळे शिवाजी विद्यापीठाने ‘लुपिन’ या औषध निर्माण कंपनीशी करार केला आहे. यामध्ये औषध निर्माण प्रक्रियेत संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. औषध निर्माण क्षेत्रातील नवीन संशोधनास चालना मिळणार आहे.

शिवाजी विद्यापीठाने काही परदेशी विद्यापीठांशी महत्त्वपूर्ण करार केले आहेत. यामध्ये दक्षिण कोरियातील म्यांग्जी विद्यापीठाचा समावेश आहे. करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये संशोधन सहकार्य वाढीस लागण्याबरोबरच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठाने साऊथ कोरियामधील चोनाम राष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. यामुळे संशोधन क्षेत्रात नावीण्यपूर्णत:, संशोधन क्षेत्रातील अनेक आव्हाने व अडचणींवर मात करणे सोपे जाणार आहे.

परदेशांशी 40 हून अधिक करार

शिवाजी विद्यापीठाने अमेरिका, युनायटेड किंगडम, क्युबा, पोर्तुगाल, नायजेरिया, नेदरलँड, वेस्ट इंडीज, तैवान, केनिया, बांगला देश, जर्मनी, पोलंड, इटली देशांबरोबर विविध 40 हून अधिक सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे विद्यार्थी, शिक्षक यांना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात फायदा होत आहे.

शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक संस्था, उद्योग, कंपन्याशी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे अध्ययन, संशोधन याबरोबरच विद्यार्थ्यांना नवीन रोजगार मिळणे शक्य होणार आहे. सामजंस्य करारामुळे स्टार्टअप, मेक इन इंडियाला पाठबळ मिळत आहे. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
– प्रा. डॉ. सागर डेळेकर, संचालक,
नवोपक्रम,नवसंशोधन व सहचार्य, शिवाजी विद्यापीठ

Back to top button