अंबाबाई मूर्तीची पाहणी पूर्ण | पुढारी

अंबाबाई मूर्तीची पाहणी पूर्ण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारपासून सुरू झालेली करवीरनिवासिनी अंबाबाईदेवी मूर्तीची पाहणी शुक्रवारी पूर्ण झाली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज व आर. एस. त्र्यंबके यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी 7 ते 9 यावेळेत मूर्तीची बारकाईने पाहणी केली. कोर्ट कमिशन आपला पाहणी अहवाल दि. 4 एप्रिलपर्यंत न्यायालयात सादर करणार आहे.

देवीच्या मूर्तीची पाहणी राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे व जिल्हाधिकारी तथा देवस्थान प्रशासक अमोल येडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अंबाबाई मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांकडून तिची पाहणी करण्याबाबतचा दावा श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. याबाबत निकाल देताना न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर. एस. र्त्यंबके यांच्यामार्फत मूर्ती पाहणीचे आदेश दिले. त्यानुसार तज्ज्ञांनी दोन दिवस पाहणी केली. मूर्तीच्या विविध भागांची निरीक्षणे नोंदवली. तसेच याबाबतच्या नोंदी अधिकार्‍यांनी नोंदवून घेतल्या. यावेळी दावेदार लाभेश मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर, देवस्थान सचिव सुशांत किरण बनसोडे, प्रतीवादी अ‍ॅड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई, महादेव दिंडे आदी उपस्थीत होते.

दर पंधरा दिवसांनी बैठक होणार : जिल्हाधिकारी

मूर्ती जतन आणि संवर्धनाबाबत देवस्थान समिती गंभीर आहे. पुरातत्त्व विभागाने दिलेला अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवालही न्यायालयात सादर केला जाईल. त्यानुसार न्यायालय जो निर्णय घेईल, त्याची प्रभावी अमंलबजावणी केली जाईल. यापुढे मूर्ती संवर्धनाबाबत श्रीपूजकांसमवेतही दर पंधरा दिवसांनी बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

Back to top button