कोल्हापूर : खुनाच्या आरोपातील पोलिस कॉन्स्टेबलचा सीपीआरमध्ये मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : खुनाच्या आरोपातील पोलिस कॉन्स्टेबलचा सीपीआरमध्ये मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वारणानगर येथील पैशाचे घबाड गायब करण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित व निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे (वय 43, रा. वासूद, ता. सांगोला) याच्या खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असणार्‍या सुनील मधुकर केदार (रा. वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) याचा उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. याबाबतची नोंद करण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वासूद येथील निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे व पोलिस कॉन्स्टेबल सुनील मधुकर केदार हे दोघेही एकाच गावातील असल्याने त्यांची घट्ट मैत्री होती. याशिवाय दोघेही पोलिस खात्यातच असल्याने त्यांचा दैनंदिन संपर्क होता. वारणानगर येथील एका पैशाच्या घबाडाचे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे हा अडचणीत आला होता. त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. तसेच तो कारागृहातही होता. याप्रकरणात सुनिल केदारने चंदनशिवेला खूप मदत केल्याचा त्याचा दावा होता. चंदनशिवेला सोडविण्यासाठी त्याने जमीन विकून पैसे घातल्याचेही तो सांगत होता. तथापि, हे पैसे देण्यास सूरज चंदनशिवे नकार देत होता. त्यामुळे केदारने चंदनशिवेचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात केदारला अटक करण्यात आली होती. सुनील केदार हा 29 ऑगस्ट 2023 पासून येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

गेल्या आठवड्यापासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला.

Back to top button