

कोल्हापूर ः सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या आरोग्याला बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियानाचे कवच मिळाले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत 12 हजार 528 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान राज्यात सर्वाधिक 3 हजार 43 बालकांवर जटील शस्त्रक्रिया केल्या आहेत. यात कोल्हापूर जिल्हा सलग दोन वर्षे राज्यात प्रथम आला आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाड्या तसेच शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. त्या तपासणीत मुलांना जडलेल्या आजारांचे, तसेच जन्मतः व्यंगत्व असणार्या मुलांवर उपचार केले जातात. त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जाते. तेथे संबंधित बालकाच्या आरोग्याची पूर्ण तपासणी करून उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. हे उपचार पूर्णतः मोफत केले जातात. त्यामुळे 11 वर्षांत शहरासह ग्रामीण भागातील 21 हजार 857 बालकांना जीवदान मिळाले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानाअंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी करून शस्त्रक्रियांमध्ये कोल्हापूर जिल्हा सलग दुसर्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यासाठी 42 पथके असून वैद्यकीय पथकात महिला, पुरूष प्रत्येकी एक डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी मधील बालकांची वर्षातून 2 तर शाळांमधील बालकांची वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी केली जाते. प्राथमिक तपासणीत निदान झालेल्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानात चांगले काम केल्याने पथकाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
आरोग्य तपासणीत आढळलेल्या हृदयरोग, कॉकलियर इम्प्लांट, अस्थिव्यंग, अन्डिसेन्डेड टेस्टीस, हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, टाळुभंग, तिरळेपणा, डेंटल, कान-नाक व घसा, कॅन्सर, किडनी, न्युरल ट्यूब डिफेक्ट यासह एकूण 104 आजारांवर उपचार केले जातात.