थेट पाईपलाईनच्या चौकशीचे स्वागतच : सतेज पाटील | पुढारी

थेट पाईपलाईनच्या चौकशीचे स्वागतच : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईनच्या कामाच्या चौकशीची मागणी खा. धनंजय महाडिक यांनी केली आहे. या चौकशीचे मी स्वागतच करतो. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी 12-13 वर्षांत आता एकदा तरी भेट दिली, मी काय काम केले ते पाहिले आणि थेट पाईपलाईनच्या माझ्या कामावर शिक्कामोर्तब केले, असे सांगत खा. महाडिक ज्या रुईकर कॉलनीत राहतात, त्या परिसरात 10 नोव्हेंबर 2023 पासून थेट पाईपलाईनचे पाणी सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याच पाण्याने ते आंघोळ करतात, असा टोला माजी मंत्री आ. सतेज पाटील यांनी लगावला. खा. धनंजय महाडिक यांनी थेट पाईपलाईनसंदर्भात केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, खासदारांनी राजकीय टीका जरुर करावी. माझ्यावर बोलावे; पण केवळ निवडणूक आहे म्हणून, एखाद्या योजनेला, शहराला बदनाम करून जनतेची दिशाभूल करू नये. त्यात काही उणिवा असतील तर बैठक घ्या, सत्ता तुमचीच आहे, त्या दूर करा. अधिकार्‍यांकडून माहिती घ्या, आकडेवारी घ्या, त्याचा अभ्यास करा आणि मग बोला, असा सल्ला देत थेट पाईपलाईनचा प्रकल्प हा काळम्मावाडी ते पुईखडी असा आहे. तो पूर्ण झाला आहे. आता त्यापुढे शहरात सर्वत्र पाणी नेण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम भाजपचेच मंत्री सुरेश खाडे यांच्या भावाकडे आहे. हे काम रेंगाळल्याबद्दल त्यांना नऊ कोटी रुपयांचा दंड झाला आहे. हा दंड माफ करावा म्हणून सरकार दरबारी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हा दंड लागणार की नाही, असा सवाल करत याबाबत उद्याच्या उद्या बैठक घ्या, असे आव्हानही आ. पाटील यांनी दिले.

पाच वर्षे भाजपची राज्यात सत्ता होती. त्यात 887 दिवस विविध परवानग्या कोणी थांबवल्या, असा सवाल करत हे सर्व ऑन पेपर आणून भाजपमधीलच कोणाला तरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न खा. महाडिक करत आहेत का, अशी विचारणा करत पाटील म्हणाले, पाईपलाईनमध्ये चुकीचे काम झाले, दुसरीच पाईप वापरली, असे विनोद दोन टर्मचे खासदार करत आहेत. आता विमानतळात कोणते स्टील वापरले, हे मी विचारणे बरोबर आहे का? थेट पाईपलाईनचे काम महापालिकेने केले आहे. पाईप घालायला पाटील गेले नव्हते आणि याला 60 टक्के निधी केंद्राने दिला आहे. पाईप चुकीची वापरली, तर ही रक्कम देताना केंद्रानेही चुकीचे केले आहे का, असा सवालही त्यांनी केला.

पांढरी, पिवळी, काळी कोणतीही पत्रिका काढा

भाजपने निवडणुकीचा सर्व्हे केला आहे. त्यात थेट पाईपलाईनचा प्रभाव आहे म्हणूनच थेट पाईपलाईनविरोधात बोलण्याचा हा प्रयोग केल्याचे सांगत, सी आणि डी वॉर्डमध्ये अद्याप काम सुरू असल्याने पाणी पोहोचलेले नाही. या भागात खासदार राहायला गेले असतील, तर माहीत नाही, असे सांगत या प्रकल्पाची पांढरी, पिवळी, काळी अशी कोणतीही पत्रिका काढा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Back to top button