कोल्हापूर : काळम्मावाडीची दुरुस्ती रखडणार; आचारसंहितेत अडकणार निविदा प्रक्रिया | पुढारी

कोल्हापूर : काळम्मावाडीची दुरुस्ती रखडणार; आचारसंहितेत अडकणार निविदा प्रक्रिया

अनिल देशमुख

कोल्हापूर : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाची गळती काढण्यासाठी करण्यात येणारी दुरुस्ती आता रखडण्याची शक्यता आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान, या आठवडाभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निविदा प्रक्रिया त्यात अडकणार, अशीच शक्यता आहे.

काळम्मावाडी धरणाची 25.39 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्यातून राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आणि भुदरगड तालुक्यांतील 46 हजार 948 हेक्टर क्षेत्रात सिंचन होते. या धरणातून कर्नाटक राज्यालाही 4 टीएमसी पाणी दिले जाते. दररोज 350 लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती सुरू आहे. धरणाच्या गळतीमुळे 2022 साली धरण 75 टक्के भरण्यात आले होते. यामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून धरणातील पाणीसाठ्यावरून संघर्षाची वेळ आली होती. धरणाची गळती काढण्यासाठी धरणाच्या काही भागात दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासनाने 80 कोटी रुपयांचा निधीही ऑक्टोबर 2023 मध्ये मंजूर केला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला. मात्र, अद्याप या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही निविदा प्रक्रियेची मुदत 13 मार्च रोजी संपणार आहे.

यानंतर या निविदांचे तांत्रिक मूल्यांकन होणार आहे. या मूल्याकंनानंतर मुख्य अभियंता यांच्याकडे मान्यतेसाठी या निविदा जाणार आहेत. त्यानंतर कमर्शिअल निविदा काढली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला काही कालावधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे गळतीची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे या कामासाठीच्या पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आणि संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर देणे सध्या तरी अडचणीचे ठरणार आहे.

 पावसाळ्यापूर्वीच हे काम सुरू करण्याबाबत पालकमंत्री आग्रही होते. मात्र, वेळेत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हे काम पावसाळ्यातच सुरू होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान जून महिन्यात जरी या कामाला प्रारंभ झाला तरी पावसाळ्यातही हे काम करता येणार असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Back to top button