कोल्हापूर : पाणीटंचाईत प्रदूषणाची भर; नदी प्रदूषण रोखणे आव्हान | पुढारी

कोल्हापूर : पाणीटंचाईत प्रदूषणाची भर; नदी प्रदूषण रोखणे आव्हान

प्रकाश पाटील

कसबा बीड : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांच्या तुलनेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, सांडपाण्याचा टक्का वाढला जात असून, दिवसेंदिवस पाणी प्रदूषणात मोठी भर पडली जात आहे. विशेष म्हणजे अनेक गावांतील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न होता, थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण रोखणे हे एक मोठे आव्हान झाले आहे.
उन्हाची वाढती तीव—ता व एकूण शिल्लक जलसाठा लक्षात घेता, पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर होत आहे. त्यामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय नदीपात्रात कपडे, धुणे, जनावरे व वाहने धुण्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे मासे, जल वनस्पती व सूक्ष्म जीव नष्ट होत आहेत. परिणामी,  नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येऊ लागली आहे. शिवाय प्रदूषणामुळे विविध आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. पाण्याचा जपून वापर करणे व पाणी प्रदूषण टाळणे हीच पाणी समस्येवर मात ठरणार आहे.
 जल गुणवत्ता व जल साक्षरता योजनेंतर्गत नदी प्रदूषण टाळणे, पाण्याची गुणवत्ता राखणे, पाण्याचा गैरवापर न करणे तसेच सांडपाण्यासाठी शोषखड्डे  करणे व  सांडपाणी नदीपात्रात न सोडता योग्य प्रक्रिया करणे, यासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या; मात्र वाढते प्रदूषण विचारात घेता, संकल्पना व्यर्थ ठरत आहेत.
पाण्याचा जास्त वापर होतो. अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे गटारींचे वाहते सांडपाणी ओढ्याद्वारे नदीच्या पाण्यात मिसळते. तसेच जैविक कचरा ओढे-नाल्यांच्या काठावर टाकला जातो. त्यामुळे नदी प्रदूषण होत आहे.
– सौ. लता सूर्यकांत दिंडे,  माजी सरपंच, बहिरेश्वर

Back to top button