मराठी भाषा आई तर कन्नड भाषा मावशी : डॉ. सुधा मूर्ती | पुढारी

मराठी भाषा आई तर कन्नड भाषा मावशी : डॉ. सुधा मूर्ती

कुरुंदवाड : जमीर पठाण : मराठी भाषा ही आई आहे तर कन्नड भाषा ही मावशी आहे. मी जगभर फिरलो असलो तरी कुरुंदवाड ही माझी मातृभूमी आहे, हे कदापि विसरणार नाही. माझ्या परिवाराचे नातेसंबंध अतूट आहेत असे सांगणाऱ्या इन्फोसीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर मूर्ती यांच्या कुरुंदवाड येथील आठवणींना उजाळा मिळाला.

कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सुधा मूर्ती यांचा आणि कुटुंबीयांचा रहिवास होता. त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. ७ नोव्हेंम्बर २०२२ रोजी सांगली येथील एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी कुरुंदवाडला धावती भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचा दवाखाना, कुमार विद्या मंदिर क्र. ३ ला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असलेल्या वाचन आणि नवनवीन कल्पना मांडल्या होत्या. त्यांचे वडील डॉ. रामचंद्र कुलकर्णी हे १९५५ साली कुरुंदवाडच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. नोबेल पारितोषिक प्राप्त आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याची आठवण त्यांनी सांगत त्यांची मोठी बहीण स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनंदा कुलकर्णी व त्यांचे येथील कन्या विद्या मंदिर क्र.३ मध्ये चौथी पर्यंतचे शिक्षण झाल्याचे सांगितले होते.

त्याकाळी डॉ. रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी पोस्टाद्वारे झालेल्या पत्रव्यवहाराची पत्रे, काही आठवणीचे फोटो, त्यांच्या बंधूंचा जन्म सुद्धा याठिकाणी झालेल्या फोटोंची आठवण आशा फोटोंचा अल्बम त्यांना भेट म्हणून नागरिकांनी दिला होता. डॉ. मूर्ती यांनी अल्बम बघितल्यानंतर भावूक झाल्या होत्या. त्यांनी शिक्षण घेतलेल्या कन्या विद्या मंदिराला भेट दिल्यावर म्हणाल्या की, जुन्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करत सध्या डिजिटल प्रणालीद्वारे विकसित झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी करून दिला पाहिजे. विद्यार्थी हे संशोधक रूपाने घडले पाहिजेत, ते कसे घडतील याकडे अधिक लक्ष शिक्षकांनी दिले पाहिजे. असे सांगत शाळेची झालेली दुरावस्था पाहून ही शाळा दुरुस्त करायला शासन पैसे देत नाही का? अशी खंत व्यक्त करत या शाळेच्या दुरुस्तीसाठी मी पैसे देईन प्रस्ताव पाठवा असे त्यांनी सांगितले होते.

आता त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याने दुरावस्था झालेल्या शाळेचा जीर्णोद्धार होणार, असा आशावाद नागरिकांना असुन त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे समजताच शहरवासीयांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा : 

Back to top button