कोल्हापूर : घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचा दुष्काळ; महापालिकेचे बजेट कागदावरच | पुढारी

कोल्हापूर : घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचा दुष्काळ; महापालिकेचे बजेट कागदावरच

सतीश सरीकर

कोल्हापूर ः महापालिका प्रशासनाने नुकताच सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. त्याद्वारे कोल्हापूरकरांना विकासाची दिवास्वप्ने दाखविण्यात आली आहेत. मात्र सन 2023-24 या चालू वर्षीचा अर्थसंकल्प प्रशासनाने वर्ष संपत आले तरीही पूर्ण केलेला नाही. केवळ आठ योजना मार्गी लागल्या आहेत; तर अर्थसंकल्पातील तब्बल 49 योजना अपूर्ण आहेत. परिणामी घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ असेच या अर्थसंकल्पाचे विश्लेषण होईल. एकूणच महापालिकेचा अर्थसंकल्प कागदावरच… असे चित्र आहे.

फक्त 64 टक्के वसुली…

चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने महसुली उत्पन्नासाठी सुमारे 568 कोटी वसुलीचे टार्गेट घेतले होते. मात्र 8 मार्च 2024 अखेर त्यापैकी फक्त सुमारे 387 कोटी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकूण टार्गेटपेकी ही वसुली सुमारे 64 टक्के आहे. यात राज्य शासनाकडून जीएसटीपोटी मिळणार्‍या 183 कोटींचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने फुगवून केलेल्या अर्थसंकल्पाचा फुगा फुटला आहे. 22 दिवसांत तब्बल 181 कोटी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

बहुतांश उत्पन्न पगारावरच खर्च…

महापालिकेकडे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. घरफाळा, नगररचना, पाणी पुरवठा, इस्टेट आणि परवाना विभागावर प्रशासनाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. यंदाच्या वर्षी नगररचना विभागाने सुमारे 60 कोटीपर्यंत चांगली वसुली केली आहे. मात्र घरफाळ्यासह इतर विभागांची कामगिरी निराशाजनक आहे. एकूण उत्पन्नापैकी बहुतांश रक्कम पगारावरच खर्च होत आहे. तब्बल 70 टक्केपर्यंत प्रशासकीय खर्च गेला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधीचा ठणठणाट आहे. शहरवासीयांकडून कर वसूल करायचा आणि अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च करायचा, असे समीकरण तयार झाले आहे.

पूर्ण झालेल्या योजना

कोटीतीर्थ तलाव
बिंदू चौकात व्हर्टिकल गार्डन
एअर फिल्टरेशन युनिट
भिंती रंगवा अभियान
ई-लायब्ररी
हेल्थ वेलनेस सेंटर
वॉटर फौंटन
अंबाई जलतरण तलाव सुधारणा

सन 2023-24 या चालू वर्षातील अपूर्ण योजना…

अमृत अंतर्गत 115 कोटींच्या जलवाहिन्या
अमृत अंतर्गत 80 कोटींच्या ड्रेनेज लाईन
मिळकतींचा रिव्हिजन सर्व्हे
तीर्थक्षेत्रांतर्गत बहुमजली पार्किंग
सौरऊर्जेवर पाणीपुरवठा
पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट
गुंठेवारी नियमितीकरण
खासगी जागेत पे अँड पार्किंग
कळंबा येथे मॉडेल रोड
महापालिका प्रशासकीय इमारत
ठिकठिकाणी ट्रॅफिक बूथ
पाणीपुरवठा विभाग एनर्जी ऑडिट
रंकाळा संवर्धन व सुशोभिकरण
हेरिटेज वॉक
खासबाग मैदानात प्रदर्शनीय खेळ
शिरोली जकात नाका येथे ट्रक टर्मिनस
हरित पट्टे व वृक्षगणना
गोकुळ हॉटेलजवळ मल्टिलेव्हल पार्किंग
हुतात्मा पार्कजवळ पूल
मनपा बागांचा विकास व रोपवाटिका
महिला संचलित मार्केट
रोड सेफ्टी प्रोग्रॅम
महिलांसाठी स्वतंत्र शौचालये
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
पंचगंगा स्मशानभूमीचा विकास
हॉकी स्टेडियम गाळे विकसित करणे
हुतात्मा स्मारक गार्डन
आकांक्षी टॉयलेट
रोड स्विपिंग मशिन
टोप लँडफिल साईट डेव्हलप करणे
पाच इलेक्ट्रिक बसेस
विद्युत दाहिनी
टेंबलाई उड्डाणपुलाखाली बगीचा
दिव्यांग भवन सेन्सरी गार्डन
मनपा इमारती व दवाखान्यात सोलर यंत्रणा
ट्रॅफिक उद्यान, जैवविविधता उद्यान
अग्निशमनसाठी क्विक रिस्पॉन्स टू व्हीलर
टर्न टेबल लॅडरसाठी बाऊझर
मिनी फायर टेंडर
डिजिटल मोबाईल रेडिओ सिस्टीम
महिला उत्पादित वस्तूसाठी विक्री केंद्र
आनंद वाचन कट्टा
तीन ठिकाणी हिरकणी कक्ष
महिलांसाठी स्टडी रूम
इनडोअर स्टेडियम
दुधाळी शूटिंग रेंज अपग्रेड करणे
सासने ग्राऊंड बॅडमिंटन हॉल दुरुस्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सुविधा

Back to top button