Kolhapur Politics : शाहू महाराजांच्या उमेदवारीवर संजय मंडलिकांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी लढाई...' | पुढारी

Kolhapur Politics : शाहू महाराजांच्या उमेदवारीवर संजय मंडलिकांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी लढाई...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : “माझी लढाई व्यक्तीसोबत नाही, तर विचारांशी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलेन, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी आज (दि.५) माध्यमांशी बोलताना दिली. (Kolhapur Politics)

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ जवळजवळ निश्चित झाला आहे. औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. मात्र, कोल्हापूर जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला सांगली लोकसभेची जागा दिली जाणार असल्याचे समजते.

2019 मध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले होते. ते शिंदे गटात गेले असले, तरी ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर आपलाच हक्क असल्याचे ठासून सांगितले आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ती नेत्यांनी मान्य केल्याचे समजते. त्यावर बुधवारच्या (दि.६) बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. “५ वर्षापूर्वी लोकांनी मला ज्या अपेक्षेने निवडून दिले त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. येणाऱ्या निवडणुकीतही लोकांच्या ज्या अपेक्षा असतील तोच माझा जाहीरनामा असेल,” असे खा. मंडलिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button