

कोल्हापूर : महापालिकेचे प्रभाग चार सदस्यीय होणार असल्याने निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले आहे. इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या पातळीवर अद्याप हालचाली नसल्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आदी पक्ष आघाडी, युती करून लढणार की स्वतंत्र रणांगणात उतरणार याकडे लक्ष लागले आहे. कारण गेल्या दोन वर्षांत राज्यातील राजकीय घडामोडींचा कोल्हापुरातही मोठा परिणाम झाला आहे. दोस्त दुश्मन झाले तर दुश्मन दोस्त बनले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुसाठीही प्रक्रिया तयार करून ठेवण्यासाठी आदेश येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असे अधिकारीवर्गातून सांगितले जात आहे. परिणामी गेले चार वर्षे वाट पाहून दमलेले इच्छुक उमेदवार आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आडून आपला प्रचार जोमात सुरू करतील.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून अपक्षांची सत्ता होती. माजी आ. महादेवराव महाडिक हे 'निवडून येईल तो आपला' या कृतीने अपक्षांची मोट बांधून ताराराणी आघाडीच्या नावाखाली सत्ता स्थापन करत होते. 2005 मध्ये महाडिक यांच्या सत्तेला राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने सुरुंग लावला. त्यानंतर निवडणुकीत पक्षांची थेट एंट्री झाली. तत्पूर्वी शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत होते. परंतु महाडिक यांचे शहरातील राजकारणावर वर्चस्व असल्याने महापालिकेवर एकहाती सत्ता आणत होते. महापालिकेच्या राजकारणाची स्थिती पाहून जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे यांनी 2010 च्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणाला रामराम ठोकला.
2010-2015 या पंचवार्षिक सभागृहासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ताराराणी आघाडी आदी स्वतंत्र लढले. कुणालाही बहुमत मिळाले नाही. 77 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसने सर्वाधिक 31 जागा पटकावल्या. राष्ट्रवादीने 25, जनसुराज्य शक्ती 4, शिवसेना 4, भाजप 3, शाहू आघाडी 1 व अपक्ष 9 विजयी झाले. मात्र नैसर्गिक मित्र म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली. त्यानंतर महापालिकेत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी आघाडी केली.
2015-2020 या पंचवार्षिक निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे मैदानात उतरले. मात्र कुणीही एकहाती सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपला महापालिकेचा गड जिंकता आला नाही. परिणामी भाजप-ताराराणी आघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. 81 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेस 30 आणि राष्ट्रवादी 14 नगरसेवक यांनी सत्तेचा झेंडा फडकवला. ताराराणी आघाडी 19 आणि भाजपने 14 जागा मिळविल्याने सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होत होती. त्यामुळे शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डिमांड आले होते. शिवसेनेला हाताशी धरून ताराराणी आघाडी – भाजपने महापालिकेत सत्तांतर करू नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेलाही सत्तेत सामावून घेतले. अशाप्रकारे राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 2019 पासून कोल्हापुरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्यावेळी हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दोन्ही पक्षांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती.
निवडणुकीबाबत उत्सुकता
गेल्या दोन वर्षांत राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्याचे परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावरही झाले. जिल्ह्यातील राजकारणात मित्र असलेले मंत्री मुश्रीफ व आ. पाटील आता एकमेकांविरोधात ठाकले आहेत; तर मंत्री मुश्रीफ व खा. धनंजय महाडिक हे विरोधक आता दोस्त झाले आहेत. राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्यासोबत असणार आहेत. मात्र महापालिका निवडणुकीला ही नेतेमंडळी एकत्र सामोरे जाणार की स्वतंत्र याविषयी उत्सुकता आहे.