कोल्हापूर : बनावट सोने तारण; बँकेची 57 लाखांची फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : बनावट सोने तारण; बँकेची 57 लाखांची फसवणूक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खोटे व बनावट सोने कर्जाला तारण देऊन लक्ष्मीपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेची 57 लाख 18 हजार 371 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी बँकेचा मूल्यांकनकार व मुख्य संशयित सागर अनिल कलघटगी (रा. धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर) याच्यासह 23 जणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांत पाच महिलांचा समावेश असून, पोलिसांनी कलघटगीसह सहाजणांना अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

संशयित सागर कलघटगीसह सतीश बाळकृष्ण पोतदार (रा. तेली गल्ली, शुक्रवार पेठ), रजनीकांत बाबुराव वडगावकर (शुक्रवार पेठ), श्रवण विजय हळवणकर (जैन मठ गल्ली, शुक्रवार पेठ), युवराज महादेव बसुगडे (शिंदे गल्ली, शुक्रवार पेठ), गोपीनाथ बाळासाहेब शेडगे (रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), उर्मिला मंगेश पाटील (बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), रोहिणी राजेंद्र पाटील (वळिगडे गल्ली, तळसंदे), मारुती सखाराम कोल्हटकर (पाटील गल्ली, मणेर मळा, उचगाव), स्वालिया इकबाल सरकवास (डंगरी बोळ, शुक्रवार पेठ), सतीश ब्रह्मदेव कांबळे (कुरकली-बेले), साऊ सखाराम कोल्हटकर (मणेर मळा, उचगाव), ओंकार प्रकाश शिंदे (म्हाडा कॉलनी, मणेर मळा), असिफ नूरमहम्मद सरखवास (सरनाईक वसाहतीजवळ जवाहरनगर, कोल्हापूर), यश राजेश भुते (एस.टी. कॉलनी, बळवंत तारा अपार्टमेंट, राजारामपुरी), उज्ज्वला संतोष रणवरे (विक्रमनगर, कोल्हापूर), सागर राजन चावरे (संभाजीनगर, कोल्हापूर), प्रथमेश प्रमोद संकपाळ (गरगाटे गल्ली, कोथळी), सुजल रवींद्र शिंदे (म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर), तुषार विजय जाधव (जाधववाडी), सादिक सिकंदर शेख (कबनूर), विकास सुरेश जाधव (मधली गल्ली, धानवडे), संग्राम दत्तात्रय सावंत (सावंत गल्ली, शिंदेवाडी, फणसवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयितांपैकी मूल्यांकनकार सागर कलघटगी, ओंकार शिंदे, सुजल शिंदे, तुषार जाधव, श्रावण हळदणकर, गोपीनाथ शेडगे यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

लक्ष्मीपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापक दीपककुमार रवींद्र प्रसादशाह (वय 42, रा. अंबाई टँकजवळ, रंकाळा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विश्वासघात करून फसवणूक

मूल्यांकनकार सागर कलघटगी याने बँकेची फसवणूक करण्याच्या इराद्याने अन्य संशयितांशी संगनमत करून खोटे व बनावट सोन्याचे जिन्नस तयार करून कर्जाद्वारे 57 लाख 18 हजार 371 रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बनावट सोन्याद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्याने बँकिंग क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Back to top button