राजू शेट्टी-महाडिक भेटीची जिल्ह्यात चर्चा | पुढारी

राजू शेट्टी-महाडिक भेटीची जिल्ह्यात चर्चा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘आप्पा, मी लोकसभेची निवडणूक लढवितोय. तुमचं लक्ष असू द्या,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना साद घातली. यावेळी महाडिक यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ‘राजू, माझे सगळीकडे लक्ष असतंय. तुमच्याकडेही आहे’, असे म्हणत प्रतिसाद दिला. या अनौपचारिक राजकीय भेटीची चर्चा कोल्हापुरात राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू राहिली.

उद्योगपती संजय घोडावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी एकाचवेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना एकत्र पाहून मोबाईल आणि कॅमेर्‍याचे फ्लॅश लखलखले. हे फोटो व्हायरल झाले. जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक आणि शेट्टी हे कधी एकत्र तर कधी विरोधात असे चित्र जिल्ह्याने अनेकवेळा पाहिले आहे. आता लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही अनौपचारिक भेट चर्चेचा विषय ठरली.

Back to top button