कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट

कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : यकृताच्या कर्करोगावरील उपचारप्रसंगी केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणार्‍या अभिनव संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले आहे. याबाबत डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. रुतीकेश गुरव, अक्षय गुरव यांनी संशोधन केले.

सध्या जगभरात यकृत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक स्तरावर यकृताचा कर्करोग स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यकृताच्या कर्करोगामुळे होणारा पुरुषांचा जागतिक मृत्युदर अधिक आहे. हा जटिल आजार आहे. आतापर्यंत या रोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, अँटिबॉडीज अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित करण्यात आल्या; परंतु उपचारादरम्यानच्या दुष्परिणामांना रुग्णाला सामोरे जावे लागते.

कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये काही औषधांचा उपयोग केला जातो; परंतु या औषधांचा इतर सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतो. सध्या वापरात असलेली कर्करोगावरील औषधे कर्करोगाच्या पेशी व इतर सामान्य पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरत आहेत. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रुतीकेश गुरव व अक्षय गुरव यांनी बारा नवीन 'डायहैड्रोपिरिमिडोन्स' सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेमध्ये तयार केली. त्यांची चाचणी 'एच.ई.पी.जी.-2' या यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत असणार्‍या पेशींवर केली. ही संयुगे खूपच निवडकरीत्या कर्करोग पेशी नष्ट करतात, असे संशोधनातून आढळून आले. या संयुगांच्या निवडकतेच्या गुणधर्मामुळेच संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

यकृताच्या कर्करोगावर इतर सर्वसामान्य पेशींना कोणताही अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणार्‍या 'डायहैड्रोपिरिमिडोन्स' सेंद्रिय संयुगांची निर्मिती करण्यात यश आले आहे. ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात. ते करीत असताना शरीरातील इतर सामान्य पेशींना अपाय करत नाहीत. त्यामुळे ही संयुगे कर्करुग्णांवर उपचारांसाठी सुरक्षित असल्याचे डॉ. हंगिरगेकर यांनी सांगितले.

यकृताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी नावीन्यपूर्ण संशोधनास पेटंट प्राप्त झाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी डॉ. गजानन राशिनकर यांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचाराच्या अनुषंगाने केलेल्या संशोधनास पेटंट मिळाले आहे. जागतिक आरोग्य क्षेत्राच्या द़ृष्टीने ही संशोधने उपयुक्त आहेत. विद्यापीठातील अन्य संशोधकांनी समाजाभिमुख संशोधन प्रकल्प आवर्जून हाती घ्यावेत.
– डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news