artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेवर रिस्क रिपोर्ट; सर्वाधिक धोका मानवाला

artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेवर रिस्क रिपोर्ट; सर्वाधिक धोका मानवाला

कोल्हापूर : अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) वापराने क्रांती घडवून आणली आहे. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर हा संपूर्ण जगाला नजीकच्या काळात संकटाच्या खाईत ढकलू शकतो, असा इशारा नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2024 जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार जगाला नजीकच्या काळात आणि काही वर्षांनंतर भेडसावू शकणार्‍या धोक्यांची जाणीव करून दिली आहे. नजीकच्या धोक्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केला जाणारा अपप्रचार किंवा त्याचा गैरवापर यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

लोकशाहीला धोका!

एआयचा गैरवापर करून केला जाणारा अपप्रचार किंवा प्रसारित केली जाणारी चुकीची माहिती जगभरातील लोकशाही धोक्यात आणू शकते. अशा पद्धतीच्या एआयच्या गैरवापरामुळे जगभरात विशिष्ट प्रकारचे सामाजिक ध्रुवीकरण वेग घेईल आणि त्यामुळे जागतिक अर्थकारणच धोक्यात येईल, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

चॅट जीपीटीची भीती!

एआयच्या माध्यमातून केला जाणार अपप्रचार जगासाठी घातक ठरेल. चॅट जीपीटीसारख्या तंत्रज्ञानामुळे आजकाल कृत्रिम साहित्यसंपदा तयार होऊ लागली आहे. या कृत्रिम साहित्य संपदेच्या जोरावर जगभरातील विविध समाजघटकांवर नियंत्रण मिळविण्याचा किंवा त्यांचा बुद्धिभेद करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कोणत्याही निवडणुकीत वेगवेगळ्या समाज घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांचे ध्रुवीकरण करण्यासाठी किंवा सायबर हल्ल्यांसाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

बहुपक्षीय राजवट!

हवामानातील जागतिक बदल, नैसर्गिक संकटे, सामाजिक ध्रुवीकरण, सायबर क्षेत्रात असुरक्षितता, वेगवेगळ्या देशांमध्ये निर्माण होत असलेली युद्धजन्य परिस्थिती या धोक्यांकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र हे धोके नजीकच्या काळातील नाहीत तर दीर्घकालीन स्वरूपाचे असल्याचेही अहवाल सांगतो. त्याचप्रमाणे पुढील दशकात जगभरातील अनेक देशांमध्ये बहुपक्षीय राजवट अवतरण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

तज्ज्ञांचे वारंवार इशारे!

एआयचा वापर आणि गैरवापर याबाबत जगभरातील एआय तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. पण जगभरातील बहुतेक सगळ्या एआय तज्ज्ञांनी या तंत्रज्ञानाचा गैरवापर जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे इशारे वारंवार दिले आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आपल्या एका अहवालात असा दावा केला होता की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे जगातील मानवी समूहासमोर फार मोठा आण्विक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत सध्या जगभर सुरू असलेले प्रयोग रोखले नाहीत तर संपूर्ण जगापुढेच अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही समस्येचे उत्तर शोधले जाऊ शकते. पण त्यामध्ये तेवढेच धोकेही दडले असल्याकडे या अहवालाने लक्ष वेधले होते.

जागतिक संस्थांचा संशय!

अमेरिकेतीलच फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट या संस्थेने गेल्यावर्षी जगभरातील सर्व देशांना एक खुले पत्र पाठवून या तंत्रज्ञानाचे सध्या सुरू असलेले सगळे प्रयोग तातडीने बंद करा, असे आवाहन केले होते. चेक पॉईंट रिसर्च या अमेरिकेतील सायबर सुरक्षा कंपनीने सायबर गुन्हेगारी जगताचा मागोवा घेऊन असे निष्कर्ष काढलेले आहेत की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण आठ ते दहा टक्क्यांनी वाढलेले आहे. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅलन मस्क यांच्यासह जगभरातील एआय क्षेत्रातील काही दिग्गजांनी जगाला एक खुले पत्र लिहून एआयशी संबंधित नवीन प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या खुल्या पत्रात म्हटले होते की, एआय तंत्रज्ञान समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे किमान सहा महिन्यांसाठी या तंत्रज्ञानाचा विकास त्वरित थांबवावा.

या सगळ्या बाबींचा विचार करता एआय वरदान ठरण्याऐवजी शाप ठरतो की काय, अशी भीती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

सुपरह्युमन संकल्पना विनाशकारी : एआय तज्ज्ञ एलिझर युडोविस्की

अमेरिकास्थित एलिझर युडोविस्की यांना कृत्रिम बुदिद्धमत्ता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विशेषज्ञ समजण्यात येते. एलिझर युडोविस्की यांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान मानवी समूहाच्या दृष्टीने विनाशकारी सिद्ध होण्याचा धोका आहे. या तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून मानवसंहार अटळ आहे. त्यामुळे जगभरातील ज्या कुठल्या देशाने या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनातील वापर सुरू केला आहे किंवा तशा दिशेने प्रयोग सुरू केले आहेत, त्यांनी ते प्रयोग आहे त्या स्थितीत बंद करणे मानवी समूहाच्या द़ृष्टीने हिताचे आहे. कारण मुळात मानवी मनाच्या भरारीतून आलेली सुपरह्युमन ही संकल्पनाच विनाशकारी आहे, असे मत युडोविस्की यांनी गेल्यावर्षी जागतिक व्यासपीठावरून मांडले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news