Lok Sabha Election 2024 | ‘मविआ’ची ऑफर येण्याची शक्यता : शाहू महाराज

Lok Sabha Election 2024 | ‘मविआ’ची ऑफर येण्याची शक्यता : शाहू महाराज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मला अजून कोणतीही ऑफर आलेली नाही; मात्र ऑफर येण्याची शक्यता असल्याचे सांगत शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केले. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आनंदच होईल, असेही सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. (Lok Sabha Election 2024)

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या झालेल्या स्नेहभोजनाला शाहू महाराज यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर शाहू महाराज उमेदवार असतील तर आपल्याला आनंदच आहे, असे वक्तव्य पवार यांनी केले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले. लोकसभेचे उमेदवारी मला मिळाली तर अनेकांना आनंद होईलच यात प्रश्न नाही. मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मला अजून कोणतीही ऑफर आलेली नाही. मात्र येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने शरद पवार यांना तुतारी हे नवीन चिन्ह दिले आहे. तुतारी कायम वाजत असते, असे म्हणत शाहू महाराजांनी या चिन्हाचे स्वागत करत कौतुक केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news