ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरू | पुढारी

ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरू

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : राज्यात बाजारपेठेत बनावट औषधांचा पुरवठा करून सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणार्‍या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने बनावट औषधांचा प्रवेश रोखण्यासाठी परराज्यांतून दाखल होणार्‍या औषधांवर करडी नजर ठेवण्यासाठी आणि नोंदणीसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र ई-मेल सुरू केले.

तसेच आता या विभागाच्या सहआयुक्तांनी राज्यातील सर्व औषध व्यावसायिकांना परराज्यांतील घाऊक औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणार्‍या विक्रेत्यांकडे जर बनावट औषधे आढळून आली, तर संबंधितांचे औषध विक्री परवाने रद्द होतीलच. शिवाय, संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे अतिरिक्त नफ्याच्या मोहापायी बनावट औषध विक्रीच्या साखळीमध्ये सहभागी होणार्‍या विक्रेत्यांना तुरुंगाची हवाही खावी लागेल.

घाऊक वितरकांवर बंधन

राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांची संघटना व औषध निर्माता कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये कंपन्यांना बनावट मालाचा शिरकाव होणार नाही, अशा पद्धतीने विपणन प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानुसार अनेक बड्या कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांकडून महिन्याला विक्री केल्या जाणार्‍या औषधांच्या सरासरी आधारे औषधे पाठविण्याचे धोरण अवलंबिले आहे. कंपनीच्या अधिकृत विपणन साखळीमार्फतच औषधांचा पुरवठा करण्यात येत असून, घाऊक वितरकांना तसे बंधनही घालण्यात आले आहे.

Back to top button