सीपीआरची खरेदी अन् मलईदार बोके : दहा कोटींची पीपीई किटस् मुदतबाह्य | पुढारी

सीपीआरची खरेदी अन् मलईदार बोके : दहा कोटींची पीपीई किटस् मुदतबाह्य

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोरोना काळात खरेदी केलेली सुमारे दहा कोटी रुपये किमतीची पीपीई किटस् वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्क येथील इमारतीमध्ये आणि अधिष्ठातांच्या निवासस्थानीही धूळ खात पडली आहेत. त्यांचा भविष्यात उपयोग होणेही शक्य नाही. हा शासनाला राजरोसपणे गंडा घातला गेला. सर्जिकल ड्रेसिंगचीही अशीच खरेदी करण्यात आली. तब्बल 90 हजार ड्रेसिंग रुग्णालयाच्या भांडारामध्ये उपलब्ध असल्याची कागदोपत्री नोंद विचारात घेतली, तर याची किंमत 10 कोटींवर जाते.

शासकीय रुग्णालयामध्ये वर्षाला सरासरी किती रुग्ण बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग व शस्त्रक्रिया विभागांतर्गत उपचार घेतात, त्याची आकडेवारी राज्य शासनाकडे पाठविली जाते. या संख्येवर आधारित शासनामार्फत औषधे, सर्जिकल साहित्य व अन्य अनुषंगिक बाबींसाठी पुढील आर्थिक वर्षाकरिता किती निधी द्यावा, याचे गणित मांडून निधी दिला जातो. असा निधी उपलब्ध झाला, की विभागप्रमुखांकडून औषधे, साहित्याची मागणीपत्रे मागवून त्यानुसार निधी वितरित करण्याचे, निविदा प्रसिद्ध करण्याचे काम रुग्णालयीन प्रशासनामार्फत होणे अभिप्रेत असते. अलीकडे या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता या संपूर्ण शासकीय प्रणालीला फाटा देऊन रुग्णालयासाठी कोणती औषधे व सर्जिकल साहित्याची गरज आहे, याचा निर्णय पुरवठादार घेऊ लागले आहेत. मंत्रालयातील लागेबांधे यातून रुग्णालयासाठी निधी आणायचा आणि स्वतःच मागणीपत्रे तयार करून त्यानुसार विभागप्रमुखांकडून मागणीपत्रे मागवून घ्यायची, असा नवा फंडा आला आहे.

यामध्ये संबंधित साहित्याची गरज किती, त्याची बाजारातील किंमत आणि प्रत्यक्ष निविदेतील दर किती, याची खातरजमा करण्याची आवश्यकताही उरली नाही. टक्केवारीच्या गणितातून हा उद्योग होतो आणि सर्वसामान्यांच्या निधीवर नियोजनबद्धरीतीने दरोडा पडतो. यामुळे रुग्णालयाला विकासासाठी किती निधी आला, यापेक्षा त्याचा वापर कोणत्या कारणासाठी व काय किंमत मोजून होतो आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोना काळामध्ये पुरवठादार अशीच मागणीपत्रे तयार करीत होते. अधिकार्‍यांच्या निवासस्थानी पुरवठादारांची बैठक होत असे. यावेळी लक्ष्मीदर्शनाचा खेळ झाला की, प्रस्तावावर स्वाक्षर्‍या होत आणि नको तेवढ्या दरात औषधे व सर्जिकल साहित्य रुग्णालयाच्या माथी मारली जात होती. यातूनच खरेदी केलेली सुमारे 10 कोटी रुपये किमतीची पीपीई किटस् धूळ खात पडली आहेत.

अनावश्यक सर्जिकल ड्रेसिंगचे करायचे काय?

सीपीआर रुग्णालयाच्या साहित्य खरेदीतही निधी संगनमताने लुटला गेला. ज्या रुग्णालयात एकेकाळी 20-30 रुपयांना मिळणारे सर्जिकल ड्रेसिंग उपलब्ध करण्यासाठी निधीची मारामार होती, त्या रुग्णालयात आवश्यकता नसलेले, विभागप्रमुखांची मागणी नसलेले हायफाय ड्रेसिंग तिपटीहून अधिक दराने खरेदी केले. गेल्या सहा महिन्यांत काही विभागांत हे ड्रेसिंग अद्याप पोहोचलेही नाही. अशी तब्बल 90 हजार ड्रेसिंग रुग्णालयाच्या भांडारामध्ये उपलब्ध असल्याची कागदोपत्री नोंद विचारात घेतली, तर याची किंमत 10 कोटींवर जाते. शस्त्रक्रियांची संख्या रोडावत असताना या अनावश्यक सर्जिकल ड्रेसिंगचे करायचे काय, याचे उत्तर शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे.

Back to top button