खानापूर : शेतकऱ्यांची बिले थकल्याने यशवंत शुगरला निर्वाणीचा इशारा | पुढारी

खानापूर : शेतकऱ्यांची बिले थकल्याने यशवंत शुगरला निर्वाणीचा इशारा

विटा; पुढारी वृत्तसेवा

खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ३० नोव्हेंबरपर्यंत द्या, अन्यथा उत्पादित साखरेचा लिलाव काढून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा इशारा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी नागेवाडीच्या यशवंत शुगर ला दिला आहे.

नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर साखर कारखान्याने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची १ फेब्रुवारीपासूनची गेल्या गळीत हंगामात घालण्यात आलेल्या ऊसाची बिले आज अखेर दिलेली नाहीत. हा विषय शेतकरी सेनेने चांगलाच लावून धरलेला आहे.

कोल्हापूर विधानपरिषद : धनंजय महाडिक म्हणाले, ‘म्हणून’ आम्ही माघार घेतली ! (video)

मात्र यशवंत शुगर प्रशासनाने नुसत्या तारखांवर तारीखा देत शेतकऱ्यांची फसवणूक चालवली आहे. ऐन दिवाळीत सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर जिल्हा बँकेत पैसे भरतो असे सांगून, हकीम बिलाचे धनादेश बँकेत जमा केले आणि पुढच्या दोन दिवसात काढून घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तसेच तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी आंदोलनही केले.
यानंतर गेल्या आठवड्यात तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या दालनात झालेल्या शेतकरी सेना आणि यशवंत कारखाना प्रशासन यांच्या

बैठकीत २५ नोव्हेंबरपर्यंत नागेवाडी गार्डी आणि साळशिंगे या गावांतील आणि संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे ३० पर्यंत अदा करण्यात यावेत अशी सूचना तहसीलदार शेळके यांनी यशवंत शुगर ला केली होती. तसेच या शिवाय ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत असेल असे सांगत, त्यानंतर आपण काहीही ऐकून न घेता, कायदेशीर कारवाई करू असा सक्त इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर शेतकरी सेनेचे प्रमुख भक्तराज ठिगळे यांच्याशी संपर्क साधला असता, आज अखेर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत तहसीलदार शेळके यांना विचारले असता, त्यांनी यशवंत कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा होतील असे सांगितले आहे.

कारखाना प्रशासनाने ३० तारखेपर्यंतची मुदत दिली असून, त्यानंतर कारखान्याकडील साखरेचा लिलाव काढून संबंधित शेतकऱ्यांना पैसे दिले जातील असे सांगितल्याचेही तहसीलदार शेळके यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

Back to top button