विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोधच्या हालचाली | पुढारी

विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोधच्या हालचाली

कोल्हापूर : सतीश सरीकर

विधान परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्वच जागा बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप-काँग्रेस-शिवसेनेत समझोता एक्स्प्रेस धावणार आहे. काँग्रेसकडून प्रस्ताव गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातही खलबते सुरू आहेत. भाजपला तीन जागा, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा असे सूत्र ठरण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. फक्त नागपूरबाबत भाजप आग्रही असल्याने रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या फेर्‍या सुरू होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील जागेचाही बिनविरोधमध्ये समावेश होऊ शकतो. उमेदवारी अर्ज माघारीचा उद्या (शुक्रवारी) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. निवडणूक बिनविरोध झाल्यास घोडेबाजाराला लगाम बसणार आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीचे रणांगण सुरू आहे. सर्वच मतदारसंघांत आपल्याच पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. परंतु, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू होते. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले व मंत्री थोरात यांनी भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेऊन बिनविरोध करण्याची विनंती केली.

काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन भाजपने संजय केनेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर मुंबईतील शिवसेनेचे सुनील शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांच्या जागाही बिनविरोध करण्यात आल्या. मुंबई महापालिकेत फक्त 29 नगरसेवक असल्याने काँग्रेसने याठिकाणी उमेदवार दिलेला नाही. मुंबईतील एक आणि धुळे व नागपूर अशा तीन जागा भाजपला तर डॉ. सातव यांच्यासह कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे.

तर सतेज पाटील बिनविरोध

भाजप-काँग्रेसमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरला तर त्यात कोल्हापूर विधान परिषदेचाही समावेश असेल. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपरिक कट्टर विरोधकांत इर्ष्येची लढाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून हाडवैर आहे. 2015 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला होता.

त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव करून बदला घेतला होता. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केली. आता पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु, निवडणूक बिनविरोध झाली तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजप घेऊ शकते. बिनविरोधची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झालीच तर भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागेल आणि सतेज पाटील बिनविरोध निवडून येतील.

असा आहे फॉर्म्युला…

भाजप – मुंबई, नागपूर, धुळे-नंदूरबार
काँग्रेस – डॉ. प्रज्ञा सातव व कोल्हापूर
शिवसेना – मुंबई व अकोला-बुलडाणा-वाशीम

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार

कोल्हापूर : सतेज पाटील (काँग्रेस), अमल महाडिक (भाजप) मुंबई : (दोन जागा) – सुनील शिंदे (शिवसेना), राजहंस सिंह (भाजप) धुळे-नंदूरबार : अमरिश पटेल (भाजप), गौरव वाणी (काँग्रेस) अकोला-बुलडाणा-वाशिम : गोपिकिशन बजोरिया (शिवसेना), वसंत खंडेलवाल (भाजप) नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप), छोटू भोयर (काँग्रेस).

Back to top button