हृदयशस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिकीकरणासाठी 50 कोटी

हृदयशस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिकीकरणासाठी 50 कोटी
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसोबत तळकोकण आणि उत्तर कर्नाटकातील हृदयरुग्णांच्या उपचारांसाठी तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू केला. या उपक्रमाने खानविलकरांचे नाव चिरंतन राहिले. दक्षिण महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित केलेल्या या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे 25 वे वर्ष सुरू असतानाच योगायोगाने खानविलकरांच्याच जयंतीदिनीच विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

मुश्रीफांच्या या कामाचे दीर्घकाळ कौतुकही होईल. तथापि, या नव्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी त्यांना हृदयशस्त्रक्रिया विभागाला आलेली अक्षम्य मरगळ झटकण्यासाठी कायद्याचा बडगा उगारावा लागेल. शिवाय, रुग्णालयाबाहेर कार्यरत असलेले रुग्ण पळवापळवीचे रॅकेट मोडून काढावे लागेल; अन्यथा या उपक्रमावर रुग्ण उपचाराऐवजीकेवळ हळदी-कुंकू घालून पूजा करण्याची वेळ येऊ शकते.

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णसेवेमध्ये हृदयशस्त्रक्रिया विभाग हा मैलाचा दगड आहे. या विभागांतर्गत हृदयरोग चिकित्सा व उपचार करण्यासाठी असलेली कॅथलॅब आता मुदतबाह्य होणार आहे. याकरिता मुश्रीफांच्या कारकिर्दीतच नव्या कॅथलॅबसाठी साडेसोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापाठोपाठ हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने पाठविलेल्या 50 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर मंजुरीची मोहोर उठल्याचे वृत्त आहे. यामुळे कोल्हापुरात हृदयशस्त्रक्रियेचे एक सुसज्ज दालन खुले होऊ शकते; पण या सुविधांचा पुरेपूर वापर करण्याची संबंधित रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग आणि सभोवताली फिरणारे दलालांचे टोळके यांची मानसिकता कशी बदलणार? हा खरा प्रश्न आहे. कारण, सध्या या विभागात तीन पूर्णवेळ प्राध्यापक, सुमारे 40 हून अधिक कर्मचारी वर्ग असूनही या विभागाची प्रगती महिन्याला दोन ते तीन शस्त्रक्रियांपलिकडे जात नाही. मग 50 कोटी रुपयांचा निधी खर्चून विभाग सुसज्ज करून कार्यप्रवण करावयाचा असेल, तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपुढे किती मोठे आव्हान आहे, याची कल्पना येऊ शकते.

हृदयशस्त्रक्रिया विभागाचे सध्याचे काम कसे सुरू आहे, याचे प्रगती पुस्तक याच विभागात उपलब्ध आहे. हृदयाची बायपास शस्त्रक्रिया ही मोठी शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते. ज्यावेळी हा विभाग स्थापन झाला, तेव्हा डॉ. श्रीकांत कोले हे एकमेव निष्णात सर्जन मुंबईहून दोन आठवडे येत होते. त्यावेळी शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी तयार होत होती आणि महिन्याला किमान 25 ते 30 शस्त्रक्रिया होत होत्या. आता रुग्णालयाच्या आस्थापनेवर तीन पूर्णवेळ कार्डिअ‍ॅक सर्जन उपलब्ध आहेत; पण शस्त्रक्रियाच होत नाहीत. जुजबी शस्त्रक्रिया होतात. गेल्या 11 महिन्यांत केवळ 30 शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि जानेवारी महिन्यात अवघी एक शस्त्रक्रिया झाली. मग हे तज्ज्ञ मनुष्यबळ शासनाचे वेतन घेऊन कोठे काम करते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (पूर्वार्ध)

…अन्यथा निधी पाण्यात जाण्याचा धोका!

कार्डिओलॉजी उपक्रमामध्ये महिन्याला 100 हून अधिक अँजिओग्राफी होतात. त्यामध्ये सरासरी 15 रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे रुग्णांच्या रोगनिदानाच्या कागदपत्रांवरून समजते. मग हे रुग्ण कोठे जातात? त्यांच्यावर कोण शस्त्रक्रिया करते? याचा शोध घेतला, तर या विभागाची आज काय अवस्था झाली आहे, याची कल्पना येऊ शकेल. यासाठी खासगी रुग्णालयांत सेवा देऊन, शासकीय वेतन घेऊन, शासकीय उपक्रम बंद पाडण्याचे कारस्थान सर्वप्रथम मोडून काढण्याचे काम मुश्रीफांना करावे लागेल; अन्यथा हा निधी पाण्यात जाण्याचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news