हसन मुश्रीफ-सतेज पाटलांतच खरी लढत | पुढारी

हसन मुश्रीफ-सतेज पाटलांतच खरी लढत

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण, याची चर्चा सुरू असतानाच अचानकपणे शाहू महाराज यांचे नाव पुढे आले. संभाजीराजे हे लोकसभेसाठी सतेज पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे सरप्राईज उमेदवार म्हणून पुढे येतील, असे वाटत असतानाच शाहू महाराज यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, खरी लढत असेल ती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यातच. त्यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

मंत्रिपदाच्या बदल्यात मुश्रीफ यांना खासदारपदाचे दान भाजपच्या पारड्यात द्यावे लागेल, तर जिल्ह्यावर काँग्रेसच्या माध्यमातून पकड ठेवलेल्या पाटील यांना आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी मजबूत करण्याचे आव्हान आहे. सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन महादेवराव महडिक यांच्या एकछत्री सत्तेला सुरुंग लावला. यात विनय कोरे यांचेही योगदान होते. मात्र, आता या सर्वांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांच्यासाठी कसोटी आहे.

पाटील यांची बाजी

2019च्या लोकसभा निवडणुकीत अंतर्गत राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांना पराभूत व्हावे लागले होते, तर शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. मंडलिक यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी दिलेली ‘आमचं ठरलंय’ ही कॅचलाईन प्रभावी ठरली. त्याची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी बी ध्यानात ठेवलंय…’चा काहीही उपयोग झाला नाही.

मुश्रीफांची जबाबदारी

हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. बदलत्या राजकीय वळणावर हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, विनय कोरे, प्रकाश आबिटकर आदी एकत्र आले आहेत. मुश्रीफ यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद व कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. भाजपसाठी लोकसभेची एक एक जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे सर्व शक्ती पणाला लावून भाजप एका एका जागेसाठी लढणार आहे. तेव्हा मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर आणि हातकणंगलेची जागा महायुतीच्या पारड्यात आणून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुतीत संघर्ष

महायुतीमध्ये नेत्यांची गर्दी झाली असली, तरी त्यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे. हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठले आहे. मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर घाटगे यांनी मुश्रीफ यांना भाजपच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे सांगितले होते. अलीकडेच घाटगे यांनी 2024 साली आपल्याला रामराज्य आणायचे आहे, असे सांगून स्पष्ट शब्दांत आपल्याला काय पाहिजे, याचा संदेश दिला आहे.

सतेज पाटील यांनी कोल्हापुरात शून्यावर असलेली काँग्रेसच्या आमदारांची संख्या नेतृत्व कौशल्यावर 6 पर्यंत वाढविली आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून आपल्या उपद्रवमूल्याची जाणीवही नेत्यांना करून दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक असेल, हे मात्र नक्की.

बदललेली राजकीय भूमिका पटवून द्यावी लागणार

महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे कधी नव्हे ते एकत्र आले आहेत. त्यांच्यात एकवाक्यता दिसत आहे. उमेदवारीबाबतही कधी नव्हे एवढी एकवाक्यता त्यांनी दाखविली आहे. महायुतीत उमेदवार कोण हा प्रश्नच नाही. संजय मंडलिक यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश करताना काही गोष्टी सोडवून घेतल्याच असणार, त्यापैकी उमेदवारीचा मुद्दा हा महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर मूळचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेना नेते खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपण राजकीय भूमिका का बदलल्या, हे जनतेला पटवून दिले की झाले. जनतेलाही त्यांची भूमिका पटणार का? यावर त्यांचे यश अवलंबून आहे.

Back to top button