कोल्हापूर : क्षीरसागर आणि पोलिसांची मस्ती चालणार नाही : अंबादास दानवे | पुढारी

कोल्हापूर : क्षीरसागर आणि पोलिसांची मस्ती चालणार नाही : अंबादास दानवे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याप्रकरणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा नोंद का केला नाही? कोण हे क्षीरसागर? त्यांना संरक्षण कशासाठी देता? असा प्रश्नांचा भडिमार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी क्षीरसागर आणि पोलिसांची मस्ती चालणार नाही, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोनवरून सुनावले.

दानवे यांच्या या फोननंतर अवघ्या 10 मिनिटांतच पोलिस उपअधीक्षक अजित टीके, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक दिलीप पोवार हे शाहू सभागृहात पोहोचले. तेथून वरपे यांना जबाब नोंदविण्यासाठी घेऊन गेले. दानवे यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात जनता दरबारचे आयोजन केले होते. दरबारात राजेंद्र वरपे यांनी मारहाण झाल्याप्रकरणी तक्रार दिली होती. गुन्हाच नोंद नसल्याने दानवे संतप्त झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक पंडित यांना चांगलेच सुनावले.

या जनता दरबारात राजेंद्र वरपे यांची तक्रार होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून मारहाण झाल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी घडले होते. याप्रकरणात तक्रार देउनही क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही, अशी वरपे यांची तक्रार होती. दानवे यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक पंडित यांना फोन केला, ‘तुम्ही कोठे आहात, मी तुमच्या ऑफिसला येतोय’, असे ते म्हणाले. त्यावेळी पंडित यांनी मी बाहेरगावी असल्याचे सांगितले. त्यानंतर दानवे यांनी क्षीरसागर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कशासाठी संरक्षण देताय? ते कोण आहेत? जे काही स्टेटमेंट लागेल ते स्टेटमेंट द्यायला मी सांगतो. आता अधिकारी पाठवा. त्यांच्यासोबतच वरपे जातील आणि स्टेटमेंट देतील, असे पोलिस अधीक्षक सांगताच अवघ्या दहा मिनिटांतच पोलिस उपअधीक्षक अजित टीके आले.

दरम्यान, या दरबारात विविध प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या. यावेळी अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, दत्ता टिपुगडे, विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे, राजू यादव, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गांभीर्याने घ्या, सामाजिक भावनेने काम करा : दानवे

दरम्यान, दानवे यांनी जनता दरबारात दाखल झालेल्या तक्रारींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या कामाकडे एखादी योजना म्हणून बघू नका, तर गांभीर्याने बघा, सामाजिक भावनेने ते काम करा, अशा सूचना दिल्या. यावेळी त्यांनी विशाळगड अतिक्रमण, पाणीपुरवठा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रंकाळा, पंचगंगा प्रदूषण आदी विविध विषयांवर अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. सरकारी दवाखान्यातील औषध साठा, बाल संगोपन योजना आदींचाही त्यांनी आढावा.

कोणाच्या बापाला घाबरायचे नाही

दानवे यांनी राजेंद्र वरपे यांनाही बोलावले. कोणाच्या बापाला घाबरायचे नाही. मोकळेपणाने जे काही स्टेटमेंट तुम्हाला द्यायचे ते द्या, अशी सूचना वरपे यांना केली.

अंध मुला-मुलींची घेतली भेट

अंध युवक मंच हणबरवाडी या संस्थेने पूर्णतः पुनर्वसनासाठी रिकामा भूखंड मिळावा, या मागणीकरिता दानवे यांची भेट घेतली. दानवे यांनी त्यांची विचारपूस करत भूखंड मिळवून देऊ, अशी ग्वाही संस्थेचे संचालक संजय ढेंगे यांना दिली.

Back to top button