कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आ. चंद्रकांत पाटील म्हणतात महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देत एकमेकांवर टीका करीत असले तरी सत्ताधारी हुशार आहेत. ते एकमेकांशी भांडतील; पण सरकार पाडणार नाहीत. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी नेत्यांवर निशाणा साधला.
'अभिमान कोल्हापूरचा' या अभियानांतर्गत सत्कार समारंभानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावरून सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर भाष्य करताना आ. पाटील म्हणाले, सत्ताधारी हुशार आहेत. त्यांना सत्तेची चांगलीच माहिती आहे. एकमेकांशी भांडतील; पण सत्ता सोडणार नाहीत. महाराष्ट्रात एकाने मारायचे, दुसर्याने समजवायचे असा राजकीय खेळ सुरू आहे, मात्र जनता मुर्ख नाही.
महसूलमंत्री असताना महसूल बुडवला, असा आरोप म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली आहे. त्याचे सर्व स्पष्टीकरण दिले आहे. आता पुन्हा विषय काढण्याचा प्रश्न येत नाही, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभेत भाजप 400 जागा जिंकणारच
प्रशांत किशोर यांनी शरद पवार, सोनिया गांधी यांची भेट घेतली असून, 2024 मधील लोकसभा निवडणुकीची विरोधकांची व्यूहरचना सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, विरोधी पक्षातून नेतृत्व कोणीही करू दे, भाजप 400 जागा जिंकणारच. रस्त्यावरील संघर्ष करणारी भाजप तयार करणार्या गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा कन्या आहेत. समजूतदार आहेत. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत, असेही ते म्हणाले.