कोल्हापुरात सराफी दुकान फोडणार्‍या टोळीला बेड्या | पुढारी

कोल्हापुरात सराफी दुकान फोडणार्‍या टोळीला बेड्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती भाऊसिंगजी रोडवर भर दिवसा सराफी दुकान फोडून 250 ग्रॅम सोने व 7 लाखांची रोकडसह 20 लाखांचा ऐवज लंपास करणार्‍या राजस्थानातील कुख्यात टोळीच्या म्होरक्यासह तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी बेड्या ठोकल्या. संशयितांकडून सोने, रोकड असा 15 लाख 30 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पथकाने पुणे जिल्ह्यातील वरवे बुद्रुक (ता. भोर) येथील नीलकमल हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. म्होरक्या पिंटू जयसिंग राठोड (25), पूनमसिंग आसुसिंग देवरा (21, रा. नून, पो. फुंगणी, ता. सिरोही, राजस्थान),  केतनकुमार गणेशराम परमार (नून, ता. सिरोही, सध्या रा. उत्तरेश्वर प्लाझा, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. केतनकुमार याने सिमंदर ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी म्होरक्यासह साथीदारांना दुकानाच्या बनावट चाव्या तयार करून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

म्होरक्या पिंटू राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने महाराष्ट्रासह अन्य राज्यात घरफोडी, जबरी चोरीसह दरोड्याचे गुन्हे केले असावेत, असा संशय आहे. यासंदर्भात राजस्थानच्या पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून माहिती घेण्यात येत आहे, असेही कळमकर यांनी सांगितले. राजस्थानातील टोळीशी स्थानिक कनेक्शन असावे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.

संशयिताकडून 224 ग्रॅम सोने, 62 हजाराची रोकड, आयफोन, मोबाईल असा 15 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीने सराफी दुकानातून 7 लाखांची रोकड लंपास केल्याने अन्य रकमेचा कुठे विल्हेवाट लावण्यात आली याचीही संशयिताकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भरदिवसा लुटला 20 लाखांचा ऐवज

शहरात रात्रंदिवस वर्दळ असलेल्या भाऊसिंगजी रोडवरील जयेश जैन (रा. ताराबाई रोड) यांच्या मालकीचे सिमंदर ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी सोने, रोकड असा 20 लाखांचा ऐवज लुटला होता. 25 जानेवारीला भरदिवसा दीड ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती.

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यातही शोधमोहीम

दुकानमालक जैन पिता-पुत्र दुपारी दुकान बंद करून जेवणासाठी घरी गेले असताना ही घटना घडली होती. भर दिवसा हा प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणेचीही तारांबळ उडाली होती. शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह कर्नाटक व गोव्यातही शोधमोहीम राबविण्यात आली होती. जुना राजवाडा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची सहा पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.

नीलकमल हॉटेलमधील वास्तव्याची लागली माहिती

स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके राजस्थानातील सिरोही येथे पाठविण्यात आली होती. संशयिताच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्याच्यावरही प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होता. या चौकशीदरम्यान म्होरक्यासह तिन्हीही साथीदारांचे पुणे जिल्ह्यातील वरवे बुद्रुक नीलकमल हॉटेलमध्ये वास्तव्य असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.

पोलिसी खाक्यानंतर पोलिसासमोर थेट लोटांगण

शोध पथकांनी पुणे जिल्ह्यातील वरवे बुद्रुक येथील नीलकमल हॉटेल परिसरात सापळा लावला. छापा कारवाईत म्होरक्या पिंटू राठोड, पूनमसिंग देवरा व केतनकुमार हाती लागले. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितानी थेट लोटांगण घालत सिमंदर ज्वेलर्समधील चोरीची कबुली दिली.

Back to top button