कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोल्हापूर मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे द्वार खुले झाले आहे. बहुजनांच्या शिक्षणासाठी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी संस्थानात 100 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याला फळ आले आहे. देशातील अॅलोपॅथी शिक्षणावर नियंत्रण करणार्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन) कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2021-22) या अभ्यासक्रमांना प्रारंभ होण्याचा अनेक अडथळ्यांचा मार्ग अखेर खुला झाला असून, यामुळे कोल्हापूरच्या आरोग्यसेवेची बळकटी होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापुरात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 14 विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रशासनाने आयोगाकडेे प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी राज्य शासनाचे आवश्यकता प्रमाणपत्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता असे सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
विहित शुल्क भरल्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तज्ज्ञांच्यापथकाने चालू वर्षाच्या प्रारंभी महाविद्यालयातील सहा विषयांच्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या शिफारस पत्राआधारे आयोगाने प्रथम औषधेशास्त्र (फार्माकोलॉजी) व सूक्ष्म जीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रत्येकी तीन विद्यार्थी प्रवेशांना मंजुरी दिली आहे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या मंजुरीचे पत्र प्रतीक्षेत असले, तरी यंदा राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा नारळ फुटणार, हे निश्चित झाले आहे.
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरू व्हावे, हे स्वप्न तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांची धडपड मोठी होती; पण त्यांना आलेल्या राजकीय अपयशाने हे स्वप्न दूर राहिले. दैनिक 'पुढारी'ने या प्रश्नाचा गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने पाठपुरावा केला. पदव्युत्तर शिक्षणामुळे समाजातील गोरगरीब, उपेक्षित समाजातील हुशार मुलांना अल्प दरात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होतील.
तसेच तेथील विद्यार्थ्यांचा सीपीआर रुग्णालयाच्या रुग्णसेवेलाही मोठा फायदा होईल, असे लक्षात घेऊन हा पाठपुरावा केला गेला. त्यामधील अडथळ्यांकडे शासनाचे वेळीच लक्ष वेधले आणि राज्यकर्त्यांनाही जागे करण्यात दै. 'पुढारी' आघाडीवर होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. आता तपासणी झालेल्या विषयांतील पदव्युत्तर शिक्षणाच्या मंजुरीचा आणि तपासणी न झालेल्या विषयांच्या तपासणीसाठी राज्यकर्त्यांनी आपले राजकीय वजन खर्ची टाकले, तर चालू शैक्षणिक वर्षात हे सर्व अभ्यासक्रम सुरू होऊ शकतात. त्यायोगे किमान 60 विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची सोय होऊ शकते.
शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर तपासणीमध्ये आयोगाच्या तज्ज्ञ पथकाने पहिल्या टप्प्यामध्ये पदव्युत्तर शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी), कान-नाक-घसा (ईएनटी), जीवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री), भूलशास्त्र (अॅनेस्थेशिया), औषध निर्माणशास्त्र (फार्माकोलॉजी), सूक्ष्म जीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या सहा विभागांची तपासणी पूर्ण केली.
यापैकी औषधशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र या दोन विषयांना आयोगाने मंजुरी दिली. त्याच्या अंतिम पत्रासाठी आवश्यक बँक हमी रक्कम जमा केल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये त्याचे अंतिम पत्र उपलब्ध होऊ शकेल. उर्वरित विषयांच्या मंजुरीची पत्रे नजीकच्या कालावधीत अपेक्षित आहेत. यंदाची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकतील.
आणखी आठ अभ्यासक्रम
या विषयांव्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयाने आणखी आठ विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सशुल्क सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आहेत. आयोगाच्या नियमानुसार त्यांची तपासणीही याच शैक्षणिक वर्षात अपेक्षित आहे. देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेतील संसर्गामुळे देशभरात तपासणीची ही प्रक्रिया थांबली होती. गेल्या 15 दिवसांपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे या विषयांच्या तपासणीसाठी आयोगाचे तज्ज्ञ पथक कोल्हापुरात केव्हाही दाखल होऊ शकते.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मंजुरीसाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. आर. एम. पवार यांनी सर्वप्रथम मेडिकल कौन्सिलकडे शुल्क जमा केले होते; पण पायाभूत सुविधांअभावी कौन्सिलने परवानगी नाकारली होती. त्यानंतर जयप्रकाश रामानंद यांनी हे प्रकरण पुन्हा उलगडले आणि डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. अजित लोकरे, डॉ. मीनाक्षी गजभिये आणि सध्याचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या कार्यकाळात त्याचा पाठपुरावा झाला. मंजूर झालेल्या विषयांमध्ये औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून डॉ. सुनीता रामानंद आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून डॉ. नीता जांगळे या काम पाहत आहेत.