‘पुढारी राईज अप’ क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के | पुढारी

‘पुढारी राईज अप’ क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी राईज अप’ उपक्रम उज्ज्वल क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल. भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी ही मोठी संधी उपलब्ध करून दिली, या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होतील. शिवाजी विद्यापीठाच्या मिशन ऑलिम्पिक उपक्रम यशस्वी होण्यास या उपक्रमाची मदत होईल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.

दैनिक पुढारीच्या वतीने गेले तीन दिवस शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर ‘पुढारी राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा अ‍ॅथलेटिक-24 स्पर्धा रंगली. रविवारी डॉ. शिर्के यांच्या हस्ते व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शानदार समारोप झाला. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 1500 हून अधिक, 9 ते 19 वर्षांखालील महिला खेळाडू 43 क्रीडा प्रकारात सहभागी झाल्या होत्या. एकूण रोख तीन लाखांच्या बक्षिसासह आकर्षक गिफ्ट व्हाऊचर खेळाडूंना देण्यात आले.

रविवारी सायंकाळी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. शिर्के म्हणाले, दैनिक ‘पुढारी’ने ही स्पर्धा सुरू केली, ती उदयोन्मुुख खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. दैनिक ‘पुढारी’ने केलेले हे काम कौतुकास्पदच आहे. यामुळे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे.

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आघाडीवर असलेल्या शिवाजी विद्यापीठाने मिशन ऑलिम्पिक हा उपक्रम हाती घेतला आहे, असे ते सांगत डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावेत, त्यांनी पदक मिळवावे, यासाठी लहान वयातच त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्याकरिता शालेय खेळाडूंचे कौशल्य ओळखून त्यांना प्रशिक्षण देणारा हा उपक्रम आहे. ‘पुढारी राईज अप’ विद्यापीठाच्या या उपक्रमासाठी उपयुक्त ठरेल.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुभेच्छा देत सहभागी खेळाडूंशी संवाद साधला. दैनिक पुढारीचे नॅशनल हेड (मार्केटिंग) आनंद दत्ता, पुढारीचे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर यांनी स्वागत केले.

पुन्हा भेटू दुसर्‍या सीजनमध्ये

या स्पर्धेच्या निमित्ताने शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांनी ‘पुढारी’चे आभार मानत, हीप हिप हुर्रे करत, ‘पुढारी’विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने पुन्हा भेटू दुसर्‍या सीजनमध्ये, असे सांगतात खेळाडूंच्या चेहर्‍यावर उत्साह संचारला.

Back to top button