शेडबाळ येथे उसाची ट्रॉली उलटून चार महिला ठार | पुढारी

शेडबाळ येथे उसाची ट्रॉली उलटून चार महिला ठार

कागवाड / अंकली, पुढारी वृत्तसेवा : शेतात रोजंदारी काम करून रस्त्याच्या बाजूने चालत घरी परतणार्‍या चार महिलांवर उसाची ट्रॉली उलटून तीन महिला जागीच ठार तर एका महिलेचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील इंदिरानगरजवळ रविवारी घडली. याप्रकरणी कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

चंपा लकप्पा तळकट्टी (45), भारती साताप्पा वडराळे (42), मालव्वा रावसाब ऐनापुरे (65) या महिला घटनास्थळी ठार झाल्या, तर उपचारासाठी घेऊन जाताना शेकव्वा नरसाप्पा नरसाई (45) या महिलेचा मृत्यू झाला. या सर्व महिला शेडबाळ गावच्या रहिवासी आहेत. या घटनेने शेडबाळ गावावर शोककळा पसरली आहे.

कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली शेडबाळनजीक इंदिरानगरजवळ आली असता ट्रॉलीच्या चाकाचा हब तुटून बाजूने चालत जाणार्‍या महिलांच्या अंगावर ट्रॉली कोसळली. त्याखाली सापडून तीन महिला जागीच ठार झाल्या, तर एक महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

याबाबत समजताच घटनास्थळी कागवाड पोलिस ठाण्याचे पीएसआय सहकार्‍यांसह दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने ऊस बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कागवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

शेडबाळ गावावर शोककळा

अपघातात गावातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने शेडबाळ गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटणार होता.

Back to top button