उजळाईवाडीजवळ अपघातात शेतकरी ठार, पुतण्या गंभीर | पुढारी

उजळाईवाडीजवळ अपघातात शेतकरी ठार, पुतण्या गंभीर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या दिशेने येणार्‍या भरधाव मोटारीने दुचाकीला जोरात ठोकरल्याने भादोले (ता. हातकणंगले) येथील शेतकरी जागीच ठार झाला; तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. सर्जेराव श्रीपती पाटील (60) असे मृत व्यक्तीचे नाव असून किरण रघुनाथ पाटील (45) या जखमीची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळील पेट्रोल पंपासमोर रविवारी दुपारी भरधाव मोटारीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. यात सर्जेराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. किरण पाटील यांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली आहे. मृत व जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. किरण यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.

कसबा सांगाव (ता. कागल) येथील एका नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे रविवारी सकाळी रक्षा विसर्जनासाठी सर्जेराव पाटील बंधू दिनकर व पुतणे किरण यांच्यासमवेत कसबा सांगावला गेले होते. विधी आटोपून सर्जेराव हे किरण पाटील यांच्या दुचाकीवरून भादोलेकडे येत होते. उजळाईवाडी उड्डाणपुलालगत कागलहून कोल्हापूरकडे धावणार्‍या मोटारीने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले. रस्त्यावर डोके आदळून ते गंभीर जखमी झाले.

कुटुंबीय, नातेवाईकांचा आक्रोश!

अपघाताची माहिती समजताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्जेराव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर करताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. सीपीआर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Back to top button