कासारवाडी, सादळे घाट की अभयारण्य? | पुढारी

कासारवाडी, सादळे घाट की अभयारण्य?

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : सादळे-कासारवाडी येथील जुने जिनिसेस कॉलेजजवळ रविवारी दिवसभर सुमारे वीस गव्यांचा कळप ठिय्या मारून होता. गव्यांचा कळप पाहण्यासाठी घाटात स्थानिक नागरिक व पर्यटक गर्दी केली होती, तर काही अतिउत्साही नागरिक जीवावर उदार होऊन कळपाच्या मागे धावत होते.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास वीस गव्यांचा कळप मादळे येथून सादळे-कासारवाडी घाटातील जुने जिनिसेस कॉलेजच्या मागील दाट झाडीतून येताना स्थानिक नागरिकांनी पाहिला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. काही वेळातच सादळे व कासारवाडीतील नागरिक गव्यांचा कळप पाहण्यासाठी येथे गर्दी करू लागले. यातच रविवार असल्याने जोतिबा व पन्हाळा येथे जाणार्‍या पर्यटकांची ही गर्दी होऊ लागली.

रस्त्यावरून अगदी थोड्या अंतरावर गव्यांचा कळप थांबल्याने नागरिक, पर्यटक पाहून आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेत होते, तर काही अतिउत्साही नागरिक गव्यांचा कळप हकलण्यासाठी त्यांच्याकडे जात होते. यावेळी काही गवे इतरत्र धावत होते. हा कळप मनपाडळेच्या दिशेने गेला. पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा जिनिसेस कॉलेजच्या पाठीमागील झाडीत येऊन थांबला. दुपारी पुन्हा हा कळप मनपाडळे डोंगर भागात गेला. दरम्यान, शनिवारी रात्री बाळासो खाडे यांच्या ज्वारी पिकाचा गव्यांनी फडशा पाडला होता.

दाजीपूर अभयारण्यात ज्याप्रमाणे गवे फिरतात, तसे गवे सादळे कासारवाडी घाटात वावरतानाचा अनुभव पर्यटक घेत होते. बघ्यांची गर्दी झाली होती. घाटाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून पर्यटक गवे आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते.

Back to top button