कोल्हापुरातील आणखी तीन उद्योजक ‘ हनी ट्रॅप ’ मध्ये | पुढारी

कोल्हापुरातील आणखी तीन उद्योजक ‘ हनी ट्रॅप ’ मध्ये

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजकांना हेरून पैसे उकळणार्‍या ‘ हनी ट्रॅप ’ ची व्याप्ती वाढतच चालली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन टोळ्यांना जेरबंद केले असतानाच बुधवारी आणखी तीन उद्योजक तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

‘ हनी ट्रॅप ’च्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांना जाळ्यात ओढल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. कापड व्यापार्‍याच्या लुटीप्रकरणी सात संशयित अटकेत आहेत.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्याचे आश्वासन देत गुन्हे दाखल करू, असे सांगितले होते. याला प्रतिसाद देत तीन तक्रारदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आले आहेत.

शिरोली एमआयडीसीत प्रकार ( हनी ट्रॅप )

शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात दोन प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. यामध्ये या उद्योजकांना अनुक्रमे 17 लाख व 2 लाखांचा गंडा घालण्यात आला. तक्रारदारांना शहरातून औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात नेऊन लुबाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीतही एका उद्योजकाला 1 लाखाचा गंडा ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून घालण्यात आला आहे.

तक्रारदारांनी समोर यावे; बलकवडे यांचे आवाहन ( हनी ट्रॅप )

कोरोना काळात मोबाईलचा वापर वाढला होता. घरी थांबणार्‍या नागरिकांनी या काळात वेगवेगळ्या अ‍ॅपचा वापर केला. या अ‍ॅपच्या आडून काहींना ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढल्याचे दिसून येते. बदनामीची भीती घालून खंडणी वसूल करण्याचे असे प्रकार यानंतर वाढले आहेत. तरी अपप्रवृत्तींना ठेचण्यासाठी असे प्रकार रोखणे गरजेचे आहे. असे प्रकार ज्यांच्या बाबतीत घडले आहेत त्यांनी बिनदिक्कत पुढे यावे, तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संशयितांवर कारवाई करू, असे आश्वासन पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिले.

Back to top button