कोल्हापूर जिल्ह्यात आणखी कुष्ठरुग्ण आढळले | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी कुष्ठरुग्ण आढळले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कुष्ठरोगींची संख्या वाढतच आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमअंतर्गत डिसेंबर 2023 अखेर 189 नवीन रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यापैकी 106 रुग्ण सांसर्गिक आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या स्पर्श मोहिमेत समाजातील कुष्ठरोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर करावे व जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधून ते लवकर उपचाराखाली आणण्याच्या सूचना शुक्रवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी जि. प.चे प्रभारी प्रशासक अजयुकमार माने होते.

आयुष्मान (गोल्डन) कार्डच्या कामकाजात राज्यासह देशात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याने तालुका अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

क्षयमुक्त भारत 2025 पंचायत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 105 ग्रामपंचायती पात्र असून त्यांचे जिल्हा व राज्यस्तरावरून परीक्षण करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींचा मार्च महिन्यात सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र होण्यासाठी आरोग्य व ग्रामपंचायत विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्ण शोधावेत. त्यांच्यासाठी फूड बास्केट देण्याकरिता दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेश गायकवाड, डॉ. फारूख शेख तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी आभार मानले.

डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याच्या सूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधीच्या खर्चाचे नियोजन दि. 15 फेब—ुवारीपूर्वी करावे. याअंतर्गत लागणारी साहित्य सामग्री, औषधे व इतर आवश्यक बाबींची खरेदी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या तसेच डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय लसीकरण वेळेत पूर्ण करावे, पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढवावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Back to top button