‘पुढारी राईज अप’मधून ऑलिम्पिकविजेते खेळाडू निर्माण होतील : पालकमंत्री हसन मुश्रीफ | पुढारी

‘पुढारी राईज अप’मधून ऑलिम्पिकविजेते खेळाडू निर्माण होतील : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी राईज अप महिला क्रीडा स्पर्धा अ‍ॅथलेटिक्स-24’ हा उपक्रम महिला क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल. यातून ऑलिम्पिक विजेते, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘पुढारी राईज अप महिला क्रीडा स्पर्धा अ‍ॅथलेटिक्स-24’ या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील नऊ ते 19 वर्षे वयोगटातील युवतींसाठी तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेचे शुक्रवारी उद्घाटन झाले.

पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळे प्रमुख उपस्थित होते. तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेचा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर शानदार सोहळ्यात शुभारंभ झाला. यावेळी माणिकचंद ऑक्सिरीजचे सागर लालवाणी, टी.जे. एस.बी. बँकेचे कोल्हापूर शाखा व्यवस्थापक पंकज कुलकर्णी, चितळे दूधचे एरिया मॅनेजर अजय पवार, कोल्हापूर जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, सचिव प्रकुल पाटील-मांगोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. डी. पाटील, आर. व्ही. शेडगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, 140 कोटी लोकसंख्येचा हा देश आहे. मात्र, ऑलम्पिकमध्ये म्हणावी तशी पदके मिळत नसल्याची खंत आहे. यामुळे अशा उपक्रमाची अत्यंत गरज आहे. असा उपक्रम सर्वांनी राबविण्याची करत आहे. त्यातून भारतीयांची पदकांची संख्या वाढेल. या स्पर्धेतून खिलाडू वृत्ती वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही नवनवे उपक्रम राबवत आहेत. त्यातून देशातील समाज मन जागृत करत आहेत. खेलो इंडिया हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

मधुरिमाराजे म्हणाल्या, महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये भक्कम पाठबळ देण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रामध्येही त्याची नितांत गरज आहे. दै. ‘पुढारी’ने ‘पुढारी राईज अप’च्या माध्यमातून महिला क्रीडापटूंना पाठबळ देण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने होत राहिल्या तर आपले स्थानिक स्तरावरील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील.

पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव म्हणाले, आपण महिला सबलीकरणाची सातत्याने चर्चा करतो. मात्र, ते केवळ आर्थिक पातळीवरच करण्याचा प्रयत्न होत असतो. महिला सबलीकरणासाठी सर्वच क्षेत्रामध्ये भरीव कार्याची गरज आहे. पुढारी माध्यम समूहाच्या प्रयोग फाऊंडेशनच्या वतीने 200 शाळांमधील विद्यार्थिनींना ज्युदोचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांसाठी होणार्‍या स्पर्धांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे महिलांसाठी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. गतवर्षी पुणे येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. पुढील वर्षापासून आठ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जातील, असेही त्यांनी घोषित केले.

Back to top button