कोल्हापूर : भटक्या श्वानांना कॅनाईन डिस्टेंपरची लागण; महिन्याभरात तब्बल १३ श्वानांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : भटक्या श्वानांना कॅनाईन डिस्टेंपरची लागण; महिन्याभरात तब्बल १३ श्वानांचा मृत्यू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : भटक्या श्वानांना सध्या कॅनाईन डिस्टेंपर आजाराने ग्रासले आहे. गेल्या महिन्याभरात रस्त्यावरील अनेक भटकी कुत्री या आजाराने त्रस्त झाली आहेत. सुमारे १३ श्वानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांनी दिली.

संबंधित बातम्या 

भटक्या श्वानांमधील या आजारावर दुर्दैवाने कोणताही इलाज होऊ शकत नाही. ज्या श्वानांचे व्हॅक्सिनेशन केले असेल, तेच या आजारातून थोड्याफार प्रमाणात बरे होऊ शकतात; पण या आजारातून ते पूर्णपणे बरे होऊ शकत नसल्याची माहिती नामजोशी यांनी दिली.

लाळ व वासातून पसरतो आजार

कॅनाईन डिस्टेंपर हा आजार भटक्या श्वानांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. लाळेतून व वास घेतल्याने आजाराचा फैलाव होतो. श्वानांमध्ये या आजाराचे सर्दी किंवा ताप हे प्राथमिक लक्षण असू शकते. सर्दी -तापानंतर पुढची पायरी निमोनिया असू शकतो; पण या लक्षणांमध्ये उपचार करेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण, निमोनियाचा हा ताप श्वानाच्या डोक्यात पोहोचतो.

सर्दी, तापामुळे श्वानाला श्वास घेण्यामध्ये अडचणी येतात व त्याच्या अंगाचा थरकाप सुरू होतो. त्याच्या डोक्यावरील कवटीचा भाग आतून हालत राहतो, जो त्याच्या मृत्यूपर्यंत सुरूच राहतो. त्याच्यासमोर खायला ठेवल्यानंतरसुद्धा तो खाऊ शकत नाही. यामुळे त्याच्यात अशक्तपणा येऊन प्रतिकारशक्तीही कमी होते. अशा अवस्थेत श्वानाला फिटस् येणे, डोक्यात प्रचंड वेदना होणे असे त्रास होतात. त्यामुळे श्वान निपचित पडून शेवटचे श्वासम घेत राहतात.

प्राणीप्रेमींना आवाहन

भटक्या श्वानांचा उपद्रव होतो म्हणून अनेकजण् टीका करतात. भटक्या श्वानांना खायल घालणाऱ्यांनी या श्वानांना नाईन इन वन किंवा सेव्हन इन वन व्हॅक्सिनेशन करून घेतले, तर त्यामध्ये रेबीजचे व्हॅक्सिनेशनसुद्धा होत असल्याने चुकून जरी भागातील कुणाला त्या श्वानाचा दात लागला, तर रेबीजचा धोका असणार नाही. त्याचबरोबर हे व्हॅक्सिनेशन केल्यामुळे गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन आणि कॅनाईन डिस्टेंपर अशा आजारापासून त्याचा बचाव होऊ शकतो, असे धनंजय नामजोशी यांनी सांगितले.

व्हॅक्सिनेशनमुळे पाळीव जनावरांना धोका कमी

पाळीव श्वानांना नाईन इन वन किंवा सेव्हन इन वन व्हॅक्सिनेशन केले जाते. त्याचप्रमाणे भटक्या श्वानांनादेखील हे व्हॅक्सिनेशन करणे गरजेचे आहे, तरच ते कॅनाईन डिस्टेंपर आजारापासून बचावू शकतात. पाळीव श्वानांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण कमी आहे. कारण, ते भटक्या श्वानांच्या संपर्कात येत नाहीत. याशिवाय त्यांचे संपूर्ण व्हॅक्सिनेशन केले असल्यामुळे कॅनाईन डिस्टेंपर होण्याची शक्यता फारच कमी असते, अशी माहिती नामजोशी यांनी दिली.

कॅनाईन डिस्टेंपर आजारामुळे गेल्या महिन्याभरात १३ भटक्या श्वानांचा मृत्यू झाला आहे. भटक्या श्वानांना कोणत्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन केले नसल्याने त्यांच्यात या आजाराचा फैलाव गतीने होत आहे.
– डॉ. राहुल पोवार, पशुवैद्य

Back to top button