सर्व शासकीय रुग्णालयात आता दिवसातून दोन वेळेला ओपीडी; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय | पुढारी

सर्व शासकीय रुग्णालयात आता दिवसातून दोन वेळेला ओपीडी; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : राज्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या अखत्यारित येणार्‍या सर्व शासकीय रुग्णालये व उपक्रमांसाठी दिवसातून दोन वेळेला बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज सक्तीचे केले आहे. यामुळे रुग्णांना आता सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेमध्ये आरोग्य निदान व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याविषयी आरोग्य सेवेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आदेश जारी केले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी लागणार आहे.

राज्य शासनाचा हा नवा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्यवर्धिनी केंद्रे यामधील बाह्यरुग्ण विभागासाठी लागू राहील. यानुसार संबंधित ठिकाणी सकाळी 8.30 ते 12.30 व सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत बाह्यरुग्ण विभाग कार्यरत राहणार आहे. या निर्णयानुसार दुपारच्या वेळी 1.00 ते 4.00 या कालावधीत योगा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रमुखांवर आहे. तसेच सोमवारी आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली, तरीही बाह्यरुग्ण विभाग सुरूच राहणार आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा निर्णय रुग्णसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण संबंधित रुग्णालयांमध्ये सकाळी ओपीडी संपल्यानंतर दवाखान्यामध्ये बंदसद़ृश्य वातावरणाचा अनुभव येत होता. शिवाय, दुपारी येणार्‍या रुग्णांवर रुग्णांच्या रक्त, लघवी व अन्य नमुन्यांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेतून करून घ्याव्या लागत होत्या. हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक असला, तरी याचप्रमाणे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फतही असा निर्णय होणे आवश्यक आहे.

कारण राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये असलेली जिल्हा रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येतात. तेथे सकाळचा बाह्यरुग्ण विभाग संपल्यानंतर रुग्णालये कमी-अधिक प्रमाणात बंद असल्याचेच वातावरण असते. जिल्ह्याच्या टोकावर राहणार्‍या तालुक्यातील जनतेला गंभीर आजाराच्या चाचण्यांसाठी कोल्हापुरात येण्यासच दुपारचा एक वाजतो. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यामुळे रोगनिदानही होत नाही आणि चाचण्याही होत नाहीत. यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी एक पाऊल उचलले, तर निम्म्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवेचे अतिरिक्त दालन खुले होऊ शकते.

Back to top button