बाजार समितीचा नाका हटणार की राहणार? | पुढारी

बाजार समितीचा नाका हटणार की राहणार?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मार्केट कमिटीमध्ये गेल्या महिनभरापासून गाजत असलेला धान्यावरील करवसुलीचा नाका हटणार की आहे त्याठिकाणी कायम राहणार, याचा फैसला मंगळवारी (दि. 30) बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे. त्याचप्रमाणे सत्तारूढ आघाडी बाजार समितीच्या उत्पन्न वाढीच्या बाजूने आहे की बाजार समितीचे उत्पन्न कमी करण्याच्या बाजूने आहे, हेदेखील उघड होणार असल्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

मार्केट यार्डमध्ये धान्यावरील करवसुलीसाठी नाका बसविण्यात आला होता. हा नाका व्यापार्‍यांसाठी अडचणीचा ठरत होता; परंतु बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा नाका बसविण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली होती; परंतु कर चुकवण्याची सवय लागलेल्या काही व्यापार्‍यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सत्तारूढ आघाडीच्या काही संचालकांना हाताशी धरले आणि त्यांचा ‘रात्रीचा खेळ रंगू लागला.’ यातून हा नाका काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. कर मागणार्‍या मार्केट यार्डमधील एका अधिकार्‍यालाच कोंडून मारहाण करण्याचा पराक्रम कारभार्‍याने केला.

मार्केट यार्डमध्ये कारभारी संचालक म्हणून सध्या ते वावरत आहेत. कागल तालुक्यातील असल्यामुळे त्यांचा पक्ष आणि गट सांगण्याची गरज नाही. अधिकार्‍यांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर या प्रकाराबाबत नेत्यांनीही त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आता थेट नाकाच काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाजार समितीच्या मंगळवारी होत असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर अधिकृत विषय घेण्यात आला आहे; परंतु या विषयावरून सत्तारूढ आघाडीतच दोन गट पडल्याचे बोलले जाते. बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यावर भर देणे आवश्यक असताना उत्पन्नात घट करणारा विषय मागे घ्यावा, अशी मागणी काहींनी केल्याचे समजते. बाजार समितीचे उत्पन्न घटविणारा विषय बाजार समिती संचालकांच्या बैठकीसमोर प्रथम विषयपत्रिकेवर आल्याचे बोलले जाते.

Back to top button