कोल्हापूर विभागात 1 कोटी 39 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप | पुढारी

कोल्हापूर विभागात 1 कोटी 39 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : यंदा राज्यातील साखर हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे कोल्हापूर विभागातील कारखाने 15 नोव्हेंबरपासून सुरू झाले. गेल्या 73 दिवसांत जिल्ह्यात एक कोटी 39 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून एक कोटी 78 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत 4 ते 5 लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे.

पाऊस कमी झाल्याामुळे यावर्षीच्या हंगामावर गंडांतर आले होते. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने साखर कारखानदारीला थोडासा दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादन वाढण्यासाठी पावसाची चांगली मदतच झाली आहे. यावर्षी देशात 509 साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात 197 साखर कारखाने सुरू झाले. कोल्हापूर विभागात सहकारी आणि खासगी मिळून 37 साखर कारखाने सुरू झाले. विभागातील कारखान्यांना 11.94 टक्के साखर उतारा मिळाला असून त्यामध्ये आतापर्यंत गाळप झालेल्या साखर उतार्‍यात सहकारी कारखान्यांमध्ये कुंभी कारखाना 13.46 टक्के प्रथम क्रमांक तर दुसर्‍या क्रमांकावर बिद्री कारखाना असून त्यांचा साखर उतारा 13.03 टक्के आहे. खासगीमध्ये दत्त दालमिया आसुर्ले कारखान्याचा साखर उतारा 13.97 टक्के आहे.

आतापर्यंत सर्वाधिक 8 लाख 35 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप जवाहर हुपरी कारखान्यात झाले आहे; तर वारणा 7 लाख 6 हजार टन, दत्त शिरोळ 6 लाख 47 हजार टन, बिद्री कारखान्यामध्ये 5 लाख 5 हजार टन, शाहू कागलमध्ये 5 लाख 77 हजार टन उसाचे गाळप झाले आहे.

हंगाम तिसर्‍या टप्प्यात

सध्या हंगाम तिसर्‍या टप्प्यात आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे 70 टन ऊस शिल्लक असल्याचा साखर सहसंचालक कार्यालयाचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखाने फेब—ुवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील. तर कोल्हापूर विभागातील कारखाने फेब—ुवारीअखेर चालतील, अशी शक्यता आहे.

Back to top button