अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तीर्थक्षेत्र विकास केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. ते अल्पकाळ कोल्हापूर दौर्‍यावर आले होते.

सातारा जिल्हा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापुरात रात्री नऊ वाजता आगमन झाले. खासदार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात, परिसराचा विकास व्हावा, याकरिता आराखडा तयार केला जात आहे. नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. या आराखड्याला गती दिली जाईल.

क्रीडा संकुलाबाबत लवकरच बैठक : बनसोडे

मोठी क्रीडा परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. त्याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल. जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर उपस्थित होते. रात्री सव्वादहा वाजता मुख्यमंत्री शिंदे, क्रीडामंत्री बनसोडे, खा. शिंदे कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ही रात्री विमानतळावरून नाशिकला रवाना झाले.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासमवेत करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा सविस्तर आढावा घेतला. तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या,

हवा तितका निधी देऊ, असे पवार यांनी सांगितले. कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचा तत्काळ आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या नव्या इमारतीबाबतही त्यांनी चर्चा केली.

शासकीय विश्रामगृहावर खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास आदींनी त्यांचे स्वागत केले.

Back to top button