पुण्यातील पत्रकार मारहाणीचा निषेध | पुढारी

पुण्यातील पत्रकार मारहाणीचा निषेध

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी’ न्यूज चॅनेलचे पुणे येथील प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल, कॅमेरामन निखिल करंदीकर यांना पुणे शहर पोलिस दलातील निरीक्षकांसह पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत आयोजित बैठकीत निषेध करण्यात आला. दसरा चौक येथील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर माध्यम प्रतिनिधींनी जोरदार निदर्शने केली.

पत्रकार संरक्षण कायदा धाब्यावर बसवून माध्यम प्रतिनिधींवर हात उगारलेल्या पोलिस निरीक्षकांसह दोषी पोलिसांविरुध्द तातडीने गुन्हे दाखल करून कायद्याचे भक्षक बनलेल्या अधिकार्‍यांना तत्काळ बडतर्फ करण्याचा एकमुखी ठराव कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांना जाब विचारणार

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी ( दि. 29) कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांना जाब विचारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे म्हणाले, पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे आश्रयदाते ठरलेल्या काही पोलिस अधिकार्‍यांनी माध्यम प्रतिनिधींवर दहशत निर्माण करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याचे जबाबदार वरिष्ठाधिकार्‍यांनी उल्लघन केल्याने संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.

कोल्हापूर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांनी माध्यम प्रतिनिधींना झालेल्या मारहाणीची पोलिस यंत्रणेशिवाय संक्षम अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सचिव बाबूराव रानगे, जावेद तांबोळी, भूषण पाटील, सतेज औंधकर, सचिन सावंत, रणजित माजगावकर, सर्वेश उरूणकर, शेखर पाटील, दयानंद जिरगे, प्रबोधन जिरगे, मुरलीधर कांबळे यांनीही पोलिसांच्या कृत्यावर टिकेची झोड उठविली. यावेळी दोषी पोलिस अधिकार्‍यांवरील कारवाईचे निवेदन राजर्षी शाहूंच्या चरणावर ठेवण्यात आले.

आंदोलनात शितल धनवडे, दयानंद लिपारे, नयन यादवाड, दत्तात्रय देवणे, हिलाल कुरेशी, मालोजी केरकर, पप्पू अत्तार, सुरज पाटील, विकास कांबळे, सुनिल सकटे, सागर यादव, अमरसिंह पाटील, डी. बी. चव्हाण, प्रविण मस्के, प्रशांत चुयेकर, विश्वास पानारी अहिल्या परकाळे आदी सहभागी झाले होते.

Back to top button